You are currently viewing कोकण इतिहास परिषदेची कार्यकारिणी जाहीर

कोकण इतिहास परिषदेची कार्यकारिणी जाहीर

वैभववाडी

कोकण इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर, उपाध्यक्षपदी डॉ.श्रीनिवास वेदक तर सचिवपदी प्रा.डॉ. विद्या प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांचे दुःखद निधन झाले. त्यापासून अध्यक्षपद रिक्त होते. रविवार दिनांक २ मे रोजी आभासी पद्धतीने झालेल्या सभेमध्ये कोकण इतिहास परिषदेच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली. नूतन अध्यक्ष श्री.सदाशिव टेटविलकर इतिहास संशोधन आणि लेखन करीत आहेत. दुर्गयात्री, दुर्गसंपदा ठाण्याची, विखुरल्या इतिहास खुणा, तुमचे-आमचे ठाणे, महाराष्ट्रातील वीरगळ, गावगाडा प्राचीन ते अर्वाचीन आदी त्यांची पुस्तके लोकप्रिय आहेत. परिषदेच्या उपाध्यक्षपदी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील इतिहास अभ्यासक डॉ.श्रीनिवास वेदक यांची निवड झाली तर सचिव म्हणून प्रा.डॉ. विद्या प्रभू यांची निवड झाली आहे.
कोकणच्या इतिहासाला एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या परिषदेची २०१० मध्ये स्थापना करण्यात आली. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी त्यांच्यानंतर श्री. रवींद्र लाड आणि आता श्री.सदाशिव टेटविलकर हे तिसरे अध्यक्ष आहेत.या परिषदेची आतापर्यंत १० वार्षिक अधिवेशने यशस्वीपणे संपन्न झाली आहेत.
तसेच कोकण इतिहास संशोधन पत्रिकेच्या संपादक मंडळाची फेररचना करण्यात आली. संपादकपदी प्रा.भारती जोशी, सदस्य डॉ.विद्या गाडगीळ, प्रा.प्रेरणा राऊत, प्रा.विकास मेहंदळे, श्री.रणजीत हिर्लेकर, डॉ.अंजय धनावडे, प्रा.रमीला गायकवाड आणि श्री.प्रवीण कदम यांची निवड करण्यात आली.
परिषदेची आभासी सभा कार्यवाह श्री.सदाशिव टेटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रा.डॉ.विद्या प्रभू, प्रा.भारती जोशी, प्रा.रमीला गायकवाड, डॉ श्रीनिवास वेदक, डॉ.अंजय धनावडे, प्रा.मंदार ठाकूर, प्रा.एस.एन.पाटील, प्रा.विकास मेहंदळे, श्री.रणजीत हिर्लेकर व श्री.प्रवीण कदम सहभागी झाले होते. कोकण इतिहास परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचे व संपादक मंडळाचे अभिनंदन कोकण इतिहास परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्री.प्रकाश भाऊ नारकर, उपाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =