You are currently viewing सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण का वाढले?

सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण का वाढले?

आरोग्य व्यवस्थेला आणि लोकांना गांभीर्य नाही का?

संपादकीय……

सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर इतरत्र मागील कोरोनाच्या लाटेच्या वेळी लोकांनी गांभीर्य दाखविले होते. लोक लक्षणे दिसल्यावर डॉक्टर कडे जाणे अथवा टेस्ट करण्याला प्राधान्य देत होती, त्यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात होती आणि मृत्यू दर देखील किरकोळ होता. मागच्या लाटेतील कोरोना तेवढा भयंकर नव्हता, उपचार केल्यावर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त होते, परंतु यावेळी मात्र कोरोना प्रत्येक व्यक्तीच्या दुखऱ्या बाजूवर वार करतो, घायाळ करतो आणि संपवतो. बरे होण्याचे प्रमाण कदाचित जास्त असले तरी ज्यांच्यावर आघात होतो ते मात्र काळजी न घेतल्याने जीवास मुकत आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात ताप, सर्दीचे रुग्ण जास्त आहेत, एरव्ही गावातील अथवा बाहेरील डॉक्टर कडे जाऊन ते उपचार घेत होते, परंतु कोविड असेल तर जिल्हा रुग्णालयात टाकणार आणि आपले काय होईल या भीतीपोटी बरेच रुग्ण घरीच सर्दी तापाच्या गोळ्या घेऊन आठवडाभर कोरोनाची लक्षणे असतानाही व्याधी अंगावर काढतात. तोपर्यंत कोरोनाने नाकातून, घशात आणि अगदी फुफ्फुसात प्रवेश केलेला असतो. त्यामुळे तद्नंतर डॉक्टर कडे जाऊन टेस्ट करून जिल्हा रुग्णालयात अथवा खाजगी रुग्णालयात दाखल झाले तरी फुफ्फुसाला मोठ्या प्रमाणात इजा पोचल्याने रिकव्हरी रेट कमी होतो, परिणामी ऑक्सिजनची शरीरातील पातळी उतरते आणि कितीही ताकदवर असला, तरुण असला तरी रुग्ण दगावतो.
तीस ते पन्नास वयोगटात देखील रुग्णसंख्या वाढली असून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यास कारणीभूत आहे तो आपण तरुण असून कोरोनाने आपल्याला काहीच होणार नाही हा फाजील आत्मविश्वास. पहिल्या चार दिवसात कोणतीही काळजी घेतली नाही, स्वतः लक्षणे दिसल्यावर विलगिकरणात राहिले नाहीत, घरातील इतरांनी रुग्णाच्या संपर्कात न येता, मास्क, सॅनिटायझर, वेळोवेळी हात स्वच्छ धुवणे इत्यादी काळजी न घेतल्यास संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून अशावेळी कोणी कोणाची काळजी घ्यावी हा प्रश्न निर्माण होतो. कोरोनाच्या भीतीने नातेवाईक, शेजारी कोणीही धावून येत नाहीत, त्यामुळे अनर्थ होण्याची भीती वाढते आहे. त्यासाठी घरात एखाद्यास साधी लक्षणे, ताप, सर्दी असेल तरी विलगिकरणात राहूनच स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्ण ऍडमिट असेल तिथे जाताना स्वतः बरोबर इतरांची देखील काळजी करणे हितावह आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक गावभर हिंडतात त्यावर स्थानिक पातळीवर कोविड पार्श्वभूमीवर नेमलेल्या समित्यांनी, सरपंच, पोलीस पाटील इत्यादींनी लक्ष ठेवला पाहिजे. आज भीतीपोटी कोविडची लक्षणे असलेले रुग्ण गावागावात घरीच ताप सर्दीची औषधे, काढे वगैरे घेऊन बरे होण्याचे प्रयत्न करत आहेत. आरोग्य सेवकांनी अशा लोकांचा सर्व्हे करून त्यांना टेस्ट करण्यासाठी, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. अन्यथा एका व्यक्तीमुळे घरातील इतरांना संसर्ग होऊन कोविडचे रुग्ण वाढण्याची भीती आहे.
जिल्ह्यातील कोविड रुग्ण प्रमाण कमी करायचे असल्यास आरोग्य व्यवस्थेने शहरी भागात नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी,तसेच ग्रामीण भागात सरपंच, पोलीस पाटील इत्यादींचे सहकार्य घेऊन कोविड रुग्णांचा सर्व्हे करून टेस्ट करण्याचे प्रमाण वाढविले पाहिजे तरच आपण कोविड वर विजय मिळवू शकतो व जिल्ह्यातील कोविडमुळे होणारे मृत्यू रोखू शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 7 =