कोळंब येथील निलक्रांती संस्थेच्या मोफत कोविड केअर सेंटरचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

कोळंब येथील निलक्रांती संस्थेच्या मोफत कोविड केअर सेंटरचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण :

निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेच्या कोळंब येथील गेस्ट हाऊसमध्ये १२ बेडचे मोफत स्वरूपातील कोविड केअर सेंटर सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. या कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज दुपारी करण्यात आले. यावेळी जेष्ठ डॉक्टर विवेक रेडकर, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर, नमिता चुरी, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, बाबी जोगी आदी उपस्थित होते.

वाढत्या कोरोना संक्रमण काळात विकी तोरसकर यांनी पुढाकार घेत मोफत स्वरूपात सुरू केलेल्या या कोविड केअर सेंटरचे आमदार वैभव नाईक व उपस्थितांनी कौतुक केले.

निलक्रांती मस्त्य व कृषी सहकारी संस्था ही नोंदणीकृत शासनमान्य संस्था असून संस्थेचे कोळंब, मालवण याठिकाणी गेस्ट हाऊस आहे. या जागेत संस्थेस कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी संस्थेच्या कांदळगाव येथील मल्टिपर्पज केंद्रामध्ये रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर च्या सहकार्याने  कोविड हेल्थ सेंटर  द्वारे करोना बाधितांना सेवा दिली होती.

निलक्रांती या केंद्रातील रुग्णांना आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सोयी सुविधा पुरविण्यासाठी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर, मालवण तसेच इतर वैद्यकीय व्यावसायिकांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच हे केंद्र पूर्णपणे शासकीय नियमावली पाळून चालविण्यात येईल, असेही तोरसकर यांनी म्हटले आहे.

खासगी संस्थेने दिलेला अशाप्रकारचा पहिलाच प्रस्ताव असून प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने होम आयसोलेशन शक्य नसलेल्या रुग्णांना उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. या केंद्रात आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधा बरोबरच तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, आहारतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, योगसाधना, निसर्गोपचार यांचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा