कोरोना – सावधानता – काळजी

कोरोना – सावधानता – काळजी

विशेष संपादकीय…..

गेले वर्षभर कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोनाचे समूळ उच्चाटन झाल्याचे चित्र उभे राहिले होते, त्यामुळे वर्षभर सावधानता बाळगणारे सर्वच लोक विनामास्क बिनधास्त वावरू लागले होते. काही  उद्योग व्यवसाय  सुरू  होत  होते,  बेरोजगारीची कु-हाड  कोसळलेले तरुण नवनवीन उद्योग व्यवसायाकडे वळले होते तर काही नव्या कामधंद्यांच्या शोधात होते. परंतु कोरोना गेला म्हणता म्हणता कोरोनाचा नवा अवतार जन्म घेऊन परत आला. “मी पुन्हा येईन” म्हणणाऱ्या देवेंद्रला जे शक्य झालं नाही ते कोरोनाने मात्र शक्य करून दाखवलं. म्हणजे नक्कीच भाजपाच्या देवेंद्रच्या टीम पेक्षा कोरोनाचे नेटवर्क जबरदस्त आहे यात शंकाच नाही.
जुन्या अवतारातील कोरोना जुन्या काळच्या रामायण महाभारतासारखाच शांत संयमी होता. आघात करायचा परंतु बेसावध असणाऱ्यांवरच. परंतु नवा कोरोना मात्र डिजिटल युगातील रंगीत टीव्हीवरील नव्या अवतारातील रामायण महाभारतासारखाच आक्रमक आहे. जो पहिले काही दिवस शांत असतो, सर्दी,अंगदुखी,ताप सारख्या छोट्या मोठ्या प्रकारांनी आपण शरीरात घुसल्याची जाणीव करून देतो. प्रचंड प्रमाणात असह्य होणारी पाठदुखी, डोकेदुखी, अंग मोडून पाडणारा थकवा आणि हळूहळू वाढत जाणारा खोकला छाताडावर कधी आक्रमण करतो हे कळत देखील नाही. काहीच तासात फुफ्फुसाला होणारा संसर्ग माणसाची ऑक्सिजन लेवल ८०/८५ वर आणून ठेवतो. बोलताना चार पावले चालताना लागणारी धाप धोक्याची घंटा वाजवते. त्या धोक्याच्या घंटेकडे दुर्लक्ष झालाच तर मात्र कोरोना आपला पाश संपूर्ण शरीराभोवती आवळायला सुरुवात करतो.
कोरोनाची लागण झाल्याचा संशय आल्यास, लक्षणे दिसल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. पहिल्या दिवसापासून आपल्यापेक्षा जास्त काळजी घ्यावी ती कोरोनाची. कोणीही कितीही म्हणोत, कोरोनाने काहीही होत नाही, फक्त गरम पाणी प्या, लिंबू पाणी प्या, हळदीचे पाणी प्या, काढा प्या…नक्कीच हे सर्व प्या, परंतु कोरोनाने तुमच्या नाकातून शरीरात प्रवेश करण्याच्या अगोदर सावधानता म्हणून हे सर्व उपाय योग्य आहेत. परंतु एकदा का शरीरात लक्षणे दिसायला लागली की फक्त तापाच्या गोळीने कोरोना जात नाही किंवा आराम करूनही कोरोना शरीरातून बाहेर जात नाही, जर तो तसाच गेला तर तो नशिबाचा भाग अन्यथा आपल्या डॉक्टर कडून योग्य ती अँटीबीओटीक औषधे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, मल्टिव्हिटॅमिन, बी कॉम्प्लेक्स अशी विविध व्हिटॅमिन ची आयुधे लढायला तयार असायला हवीत. त्यातूनही एखाद्याची इम्मुनिटी पॉवर चांगली असेल आणि त्याच्या शरीरातील ताकद जर कोरोनाच्या विषाणूंवर भारी पडली तरच बिना औषधांचे काहीजण कोरोनाच्या तडाख्यातून वाचतात. परंतु नव्या अवतारातील कोरोना मात्र शक्तिमान पेक्षाही ताकदवर आहे. जो आपली क्षमता लागण होणाऱ्या प्रत्येकाला दाखवून देतोच.
आपल्या डॉक्टरनी दिलेल्या औषधांनी चार ते पाच दिवसात जर लक्षणे कमी होऊन ताप, खोकला कमी होत नसेल तर कोरोनाची चाचणी करून अहवाल येताच जवळच्या शासकीय रुग्णालयात ॲडमिट होणे हाच योग्य पर्याय आहे. काही ठिकाणी चांगल्यापैकी काळजी घेतली जाते आणि पॉझिटिव्ह आल्यावर शासकीय रुग्णालयात दिला जाणारा फॅबीफ्लू, सारखा अँटीबीओटीक आणि व्हिटॅमिन च्या डोस मुळे तात्काळ रुग्णाला आराम मिळू लागतो जो इतर खाजगी रुग्णालयातील अँटीबीओटीक औषधांनी लवकर मिळत नाही. त्यामुळे मनात कोणतीही शंका, भीती न बाळगता सरकारी रुग्णालयातून उपचार घ्यावेत ज्याने तात्काळ आणि लवकर कोरोनापासून मुक्ती मिळते. त्यातूनही जर कोरोनाचे इन्फेक्शन वाढले, ऑक्सिजन लेवल कमी झाली तर शासकीय रुग्णालयात मुबलक ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे, रेमडेसीविर इंजेक्शन जी बाहेर उपलब्ध नाहीत त्यांचाही गरजेनुसार साठा शासकीय रुग्णालयांना केला जात असल्याने डॉक्टरांशी आणि रुग्णालय कर्मचार्यांशी योग्य समन्वय साधल्यास योग्य ते उपचार मिळतात, त्यामुळे विनाखर्च आपला रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन बरा होतो.
काहीवेळा कोरोनाने चव जाते तर काहीवेळा नाकाने येणारा वास नाहीसा होतो. वास आठ दहा दिवसांत पुन्हा येतो तेव्हा कोरोनाची ताकद कमी झाल्याची जाणीव होते. परंतु घेतलेल्या अँटीबीओटीक औषधांमुळे आणि कोरोनाने पिळून शरीराची वाट लावल्याने कमालीचा अशक्तपणा शरीरास जाणवतो. कोरोना दूर गेल्यावर अगदी दहा पंधरा दिवस कोणतीही व्हिटॅमिन,अंडी,दूध पिऊनही सहजासहजी शरीरास ऊर्जा मिळत नाही. अंगात ताकद नसल्याची, अगदी शरीर हवेत हलकेच उचलत असल्याची सुद्धा जाणीव होते. हा शरीरातील अशक्तपणा घालवण्याचे उत्तम साधन म्हणजे पोषक आहार, अंडी, दूध पालेभाज्या, चिकन आणि याच बरोबर दिवसभर जमेल तेवढे कोमट,गरम पाणी, कोमट पाण्यातून लिंबू, हळदीचे पाणी, आवळा रस इत्यादी द्रवरूप जेवढे पिता येईल तेवढे प्यायचे. तरच शरीराचा थकवा लवकर दूर होण्यास मदत होईल आणि कोरोनाचा शरीरावरील प्रभाव कमी होण्यास मदत होईल.
कोरोना होता आणि आजही आहे. काहीजणांना त्याचा फटका बसला तर काहीजण त्यातून सहीसलामत सुटले तर काही अगदी भरडले गेले. काहींनी लाखो खर्च केले तर काही विनाखर्च देखील शासकीय खर्चात बरे झाले. त्यामुळे कोरोना पासून बचावासाठी सावधगिरी हा सर्वोत्तम पर्याय आहे. मास्क लावणे म्हणजे कोरोनापासून बचाव नसून मास्क हा केवळ तात्काळ पर्याय आहे, परंतु गर्दीच्या ठिकाणी न जाणे, शक्यतो दुसऱ्याशी होणारा संपर्क टाळणे, खोकला, सर्दी,ताप असेल तर स्वतःला घरच्यांपासून देखील अलिप्त ठेवणे, आपले कपडे वेगळे ठेवणे, ताट वगैरे जेवणाची भांडी देखील वेगळी ठेवणे. दिवसातून गरज असेल तेव्हा तेव्हा हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर लावणे, गरम पाणीच पिणे इत्यादी गोष्टी करून कोरोनापासून आपला बचाव करू शकतो.
कोरोना आजही आहे, सावध रहा आणि स्वतः बरोबर इतरांचीही काळजी घ्या….तरंच आपण कोरोनामुक्त होऊ शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा