कणकवलीत 10 दिवसांचा जनता कर्फ्यु

कणकवलीत 10 दिवसांचा जनता कर्फ्यु

सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी संघ, पोलीस, महसूल यंत्रणा यांच्या संयुक्त बैठकीत एकमुखी निर्णय

कणकवली

कणकवली शहर हा कोरोनाचा हॉटस्पॉट होत चालला असून शेवटचा उपाय म्हणून कणकवली शहरात 1 मे पासून 10 मे पर्यंत 100 टक्के जनता कर्फ्यु चा एकमुखी निर्णय सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी संघटना, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. केवळ दवाखाने, मेडिकल स्टोअर्स सुरू असतील.दुधविक्री सकाळी 6 ते 8 या वेळेतच सुरू राहील.

कणकवली शहरासह तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. कणकवली शहरातील कोव्हीडबाधितांची मृत्यू संख्याही जिल्ह्यात जास्त आहे. शहरात सध्या 181 सक्रिय रुग्ण आहेत. तर मागील दोन महिन्यांत 25 कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. समूह संसर्गाचा धोका कणकवली शहरात वाढत आहे. येत्या काही दिवसांत याचा विस्फोट होऊ शकतो. कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी 10 मे पर्यंत कणकवली शहरात उत्स्फूर्तपणे 100 टक्के कडकडीत बंद चा एकमुखी निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.गतवर्षी 8 दिवस पाळलेल्या कडकडीत जनता कर्फ्युनंतर शहरातील रुग्ण संख्या अगदी नगण्य झाली होती. 10 मे पर्यंत शहरात गर्दी होईल असे घरगुती कार्यक्रम टाळावे.शहरातील मंगल कार्यालयात लग्न समारंभही 10 मेपर्यंत करू नयेत असे आवाहन नगराध्यक नलावडे यांनी केले. जनता कर्फ्यु चे पालन न केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी जनता कर्फ्यु पाळून सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा