कोरोनाच्या वाईट काळात शाळेचा अनोखा उपक्रम…

कोरोनाच्या वाईट काळात शाळेचा अनोखा उपक्रम…

पालकांना रेशन तर गरजू मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाइलचं वाटप..

 

सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रसार वेगात होतं असून राज्याची स्थिती बिकट बनत चालली आहे. त्याचबरोबर राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानं अनेकांचा रोजगारही गेला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येत आहे. कुटुंबातील आर्थिक गणितं बिघडल्यानं अनेकांना एक वेळचं जेवणही मिळणं कठीण झालं आहे. अशा स्थितीत अनेक लोकांना डोक्यावरील कर्जाचं ओझं, मुलांचं शिक्षण, घरातील मुलींची लग्न अशा अनेक समस्या सतावत आहेत. तसेच अनेकांना शाळेची फी किंवा ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल फोन उपलब्ध नसल्यानं शैक्षणिक हक्कांपासून ही वंचित राहावं लागत आहे.

परंतु, मुंबईच्या मालाड मालवणी परिसरातील गुरुकुल इंग्लिश हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी कोरोना काळात आधार ठरत आहे. मालवणी परिसरात असणाऱ्या गुरुकुल इंग्लिश हायस्कूलने आपली सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसाठी मदतीचा हात देऊ केला आहे. या शाळेनं मागील एका वर्षांत कोरोना विषाणूशी झगडणाऱ्या अनेक लोकांना मदत केली आहे. त्यांनी गेल्या एका वर्षभरात मालाड मालवणी परिसरातील दहा लाखाहून अधिक गरजू लोकांना जेवणाचं वाटप केलं आहे.

शाळेच्या या अनोख्या उपक्रमामुळे गरजू लोकांची काही प्रमाणात होरपळ कमी होतं आहे. या शाळेनं संकटकाळात पालकांना वेठीस न धरता शाळेची फी देखील कमी केली आहे. एवढंच नव्हे तर शाळेतील 7500 गरजू पालकांना एक महिन्याचं रेशन किट दिलं आहे. त्यामुळे कोरोना काळात रोजगार आणि नोकरी गेल्याच्या काळात शाळेचा हा आधार मोलाचा ठरत आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या शैक्षणिक क्षेत्र अभुतपूर्व संकटाशी सामना करत आहे. यामुळे प्रशासनाकडून अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग खुला केला आहे. पण असंख्य विद्यार्थांकडे किंवा त्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नसल्यानं त्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. विद्यार्थ्याची ही गरज लक्षात घेऊन मालवणीतील गुरुकुल इंग्लिश हायस्कुलने शंभर गरजू विद्यार्थ्यांना मोबाइल फोनचं वाटप केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा