You are currently viewing ……..तरीही तिने आनंदाची उभारली गुढी : कासार्डे येथील वैजयंती मिराशी

……..तरीही तिने आनंदाची उभारली गुढी : कासार्डे येथील वैजयंती मिराशी

गेली 5 वर्षे राहते पडक्या घरात : शासनाची मदत मिळण्यासाठी आर्त हाक

तळेरे

गेल्या पाच वर्षांपासून पडक्या घरात राहुनही ती सर्व सण उत्साहात साजरी करते. घरात रहायला जागा नसल्याने ती घरासमोरील अंगणात रात्रीची झोपते. पावसाळयात तात्पुरता कागद लावुन दिवस काढते. काम केले तरच हाताचा आणि तोंडाचा सबंध येतो. मागणी एकच आहे, आयुष्याच्या अखेरच्या दिवसात तरी घर बांधायला शासकीय मदत मिळावी. कासार्डे तर्फेवाडी येथील वैजयंती शांताराम मिराशी या साठ वर्षीय वृध्देची अशी थरारक जीवनकथा अनेकांना सदगदीत करते.

कणकवली तालुक्यातील कासार्डे तर्फेवाडी येथील साठ वर्षीय वैजयंती शांताराम मिराशी या वृध्देच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घर पडले आहे. दररोज तोंडाचा आणि हाताचा सबंध येईल का? याबाबत प्रश्न असताना तिने आज आपल्या घरासमोर आनंदाची गुढी उभारली असली तरीदेखील तिला मदतीची आवश्यकता आहे. हे सत्य नाकारुन चालणार नाही.

कासार्डे तर्फेवाडी येथील वैजयंती शांताराम मिराशी ही साठ वर्षीय वृध्द महिला एकटीच घरात राहते. गेल्या अनेक वर्षांपासून घर बांधणीसाठी शासकीय मदत मिळावी यासाठी ती प्रयत्नशील आहे. मात्र कोणीही दाद देत नाहीत. स्वत: काम करेल त्याचवेळी दोन वेळचे जेवण मिळते, अशी परिस्थिती असताना शासकीय मदतीसाठीही तिची उपेक्षाच पदरी पडली.

मातीचे आणि कौलारु असलेले घर पाच वर्षांपूर्वीच पडले. त्याच घरात कशीबशी राहते. गेले वर्षभर घरात विज नसल्याने घरासमोरील वीज खांबावरील विजेच्या प्रकाशात जेवण करते आणि घरासमोरच घराबाहेर  एकटीच झोपते. आजुबाजुला जंगल सदृश्य परिस्थिती असताना ती वृध्दा धाडसाने राहत आहे.

घराच्या आजुबाजुला फारसी घरेही नाहीत. मग या पडक्या घरात पावसाळ्यात राहता कसे? यावर माहिती देताना म्हणाली की, पावसाळ्यात कशितरी कागद टाकुन राहते. कसेतरी दिवस काढते. जवळजवळ गेली 10 वर्षे घर बांधणीसाठी मदत मिळावी म्हणून मी अक्षरश: वाट चालते, मात्र कोणीही दाद देत नाही. माझ्या आता अखेरच्या दिवसात तरी घर बांधायला शासन मदत देईल का? असा प्रश्न उपस्थीत करते.

मागच्या पावसाळ्यात वीज मीटर जळल्याने मीटर काढून ठेवला आहे. नवीन मीटर घ्यायचा तर पैसे भरायची तेवढी आर्थिक ताकद नाही. त्यामुळे दरमहा येणारे वीजबील भरते. याही वयात काम करुन मी दिवस काढत असल्याचे आर्ततेने ती सांगते. या पावसाळ्यापुर्वी घर बांधणिसाठी मदत मिळावी, अशी तिची इच्छा आहे.


कासार्डे तर्फेवाडी येथील वैजयंती शांताराम मिराशी या आपल्या पडक्या घरात आनंदाची गुढी उभारताना दिसत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा