सिंधुदुर्ग पत्रकार भवनासाठी दीड कोटीचा निधी प्राप्त; गणेश जेठे…

सिंधुदुर्ग पत्रकार भवनासाठी दीड कोटीचा निधी प्राप्त; गणेश जेठे…

सिंधुदुर्गनगरी

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी येथे त्यांचे स्मारक व पत्रकार भवन उभारण्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम पत्रकारांचे आणि महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. या भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून फर्निचर आणि सुशोभिकरणासाठी आवश्यक असणारा १ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी दिली आहे.
श्री. जेठे यांनी सांगितले की, पत्रकार भवनासाठी ४ कोटी ५५ लाखाच्या निधीला मंजूरी मिळाली होती. त्यातील ३ कोटींचा निधी प्राप्त झाला होता, त्यातून भवनाच्या इमारतीचे बांधकाम, रंगकाम आणि विद्युतीकरण व साऊंड सिस्टीमचे काम हाती घेण्यात आले होते. त्यातील बांधकाम व रंगकाम पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण आणि साऊंड सिस्टीमचे काम सध्या सुरू आहे. अद्यापही फर्निचर आणि इतर कामांसाठी १ कोटी ५५ लाख रूपयांचा जो शिल्लक येणे निधी होता तो प्राप्त होणे आवश्यक होते. त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक आणि अध्यक्ष गजानन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू होते. आम्ही उपाध्यक्ष रमेश जोगळे बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री उदय सामंत आमदार दीपक केसरकर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबईत भेट घेऊन निधी मिळण्याची मागणी केली होती . पालकमंत्र्यांनी ग्रामविकास खात्याकडे निधीच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला होता .त्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी मोठी मदत केली होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आमची भेट घालून दिली होती. तसेच आमची मागणी वित्तमंत्री अजित पवार यांच्यामार्फत पोहचविली होती. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बूधवळे आणि अभियंता विनायक जोशी यांनीही प्रस्ताव परिपूर्णतेसाठी सहकार्य केले होते.
आता हा निधी कोषागार कार्यालयाकडे असून तो लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच तांत्रिक मान्यता घेऊन पुढील कामाची निविदा काढण्यात येणार आहे. त्यासंबंधी सनियंत्रण समितीची बैठक बोलावण्यात येणार असून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होऊन सिंधुदुर्गातील पत्रकारांचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असेही श्री. जेठे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा