You are currently viewing वनविभागातील ‘बदली पास’ चे रॅकेट उघड

वनविभागातील ‘बदली पास’ चे रॅकेट उघड

एकाच पासच्या माध्यमातून दोन ते तीन वेळा वाहतूक

अर्जदाराच्या खोट्या सह्या करून परस्पर पास वितरीत

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनविभागात लाकूड वाहतुकीच्या नावाखाली बदली पासचे रॅकेट कार्यरत असून एकाच पासच्या माध्यमातून दोन ते तीन वेळा लाकूड वाहतूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केली जात असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी दिली.

लाकूड वाहतुकीच्या नावाखाली होणाऱ्या बदली पासमागील आर्थिक व्यवहाराबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९२ गावात वृक्षतोडीला सरसकट बंदी असताना राजरोसपणे लाकूड वाहतूक होत आहे.

यासाठी वन विभागाकडून वाहतूक पासही उपलब्ध करून दिले जात आहेत. याच वाहतूक पासच्या माध्यमातून बदली पासचे रॅकेट जिल्ह्यात कार्यरत आहे. सिंधुदुर्गातील लाकूड वाहतूक मोठ्या प्रमाणात कोल्हापूर येथे केली जाते. यासाठी दोन ते तीन दिवसाची मुदत घालुन वाहतूक पास घेतला जातो. मात्र, वाहतूक मार्गावरील वनविभागाची सर्व नाकी मॅनेज करून पहिली वाहतूक केली जाते व नंतर त्याच पासवर दोन वेळा वाहतूक केली जाते आणि तिसर्‍या वेळी गाडी खराब झाल्याचे सांगून बदली पास मागितला जातो आणि या बदलीपासच्या माध्यमातून बिगर परवाना तोडलेल्या जळावू नगी मालाची वाहतूक केली जाते. हा बदली पास मिळण्यासाठी लाकडाच्या तेजी-मंदी नुसार एका बदली पासची किंमत सहा हजार ते दहा हजार इतकी वन अधिकाऱ्यांकडून घेतली जाते, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

हा सर्व प्रकार अधिकार्‍यांच्या आशिर्वादाने सुरू असून मालकी प्रकरणातही असे प्रकार केले जातात. त्यामध्ये अर्जदाराच्या बनावट सही करून प्रकरण मंजूर करण्यासाठी पाठवले जाते. हा प्रकारही माहितीच्या अधिकारात पुढे आला असून कुडाळ गोठोस येथील पाटील नामक व्यक्तीच्या नावे केलेल्या बदली पाससाठी प्रकरण करुन खोट्या सह्या केल्या. हे प्रकरण जानेवारी २०१९ मध्ये करण्यात आले. या एकाच दिवसांमध्ये स्थळ पंचनामा, अर्जदाराचे जबाब, वनपाल यांची शिफारस वगैरे बाबी पूर्ण करून वनक्षेत्रपाल कुडाळ यांच्यामार्फत उपवनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी यांच्या कार्यालयात पाठवण्यात आले होते. मात्र, याचा संशय आल्याने सहाय्यक वनसंरक्षक यांनी चौकशी केली असता सदरच्या प्रकरणावरील सह्या खोट्या असल्याचे समोर आले संबधीत पाटील नामक व्यक्तीने सह्या आपले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बदली पासचे रॅकेट समोर आले आहे.

वनविभागात काही जणांच्या माध्यमातून हे प्रकार सुरु आहेत. विशेष म्हणजे ज्या व्यक्तींच्या नावावर हे पास दिले जात आहेत तेच यापासून अनभिज्ञ असल्याचेही उघड झाले आहे. तसेच अशाच प्रकारचे रॅकेट विनापरवाना वृक्षतोड दंडात्मक कारवाई करून ते पुन्हा नियमित करण्याचे प्रकारही सुरु आहेत. या सगळ्या प्रकारामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांचा वरदहस्त असलेला सावंतवाडी वन विभागातील एक अधिकारी मुख्य सूत्रधार असल्याचेही बरेगार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 13 =