सिंधुदुर्गात जेष्ठांपेक्षाा तरुणाईला  सर्वाधिक कोरोनाचा विळखा

सिंधुदुर्गात जेष्ठांपेक्षाा तरुणाईला सर्वाधिक कोरोनाचा विळखा

ओरोस (सिंधुदुर्ग)

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना असल्याचे वाक्‍य सर्रासपणे फेब्रुवारी 2020 पासून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांपासून अनेक व्यक्ती बोलत असल्याचे आपण ऐकत आलोय. सिंधुदुर्ग मात्र याला अपवाद ठरताना दिसत आहे. कारण फेब्रुवारी 2020 ते मार्च 2021 या 13 महिन्यांत जिल्ह्यात 7 हजार 122 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यातील 11 ते 40 वयोगटातील तब्बल 3 हजार 927 रुग्ण आहेत. शून्य ते 10 व 41 ते 71 वर्षांवरील 3 हजार 927 रुग्णांचा यात समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी झाला आहे. गेल्या तेरा महिन्यांत ऑगस्ट ते ऑक्‍टोबर 2020 हे तीन महिने वगळता उर्वरित दहा महिन्यांत कोरोना नियंत्रणात राहिला आहे.

बाधित संख्या 31 मार्चपर्यंत 7 हजार 122 आहे; मात्र या बाधितांमध्ये तरुणाईची संख्या लक्षवेधी आहे. 31 ते 40 या वयोगटातील सर्वाधिक 1399 रुग्ण आढळले आहेत. 21 ते 30 गटातील 1196 रुग्ण मिळाले आहेत. ही संख्या राज्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत तरुणाई कोरोना बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे.

 

जिल्ह्यात फेब्रुवारी 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 77 हजार 755 कोरोना चाचणी करण्यात आल्या. यातील 7 हजार 122 चाचणी बाधित आल्या आहेत. यातील 6 हजार 509 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. 183 जणांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 91.39 टक्के राहिला आहे. मृत्यु दर 2.6 टक्के आहे. चाचणी घेतलेल्या संख्येतील बाधित संख्या प्रमाण 10.08 टक्के राहिली आहे. एकूण बाधित रुग्णामध्ये 59 टक्के पुरुष तर 41 टक्के महिलांचा समावेश आहे.

मार्चमध्ये उसळी

जिल्ह्यात फेब्रुवारी 2020 मध्ये एकही रुग्ण आढळला नाही. मार्चमध्ये एक, एप्रिलमध्ये एक रुग्ण मिळाला. मेमध्ये 54 रुग्ण मिळाले. जूनमध्ये 160 रुग्ण मिळाले. जुलैमध्ये 161 रुग्ण मिळाले. ऑगस्टमध्ये 916 रुग्ण मिळाले. आतापर्यंतची एका महिन्यात मिळालेली वर्षातील तिसरी उच्चांकी संख्या आहे. सप्टेंबरमध्ये तर कहर झाला होता. वर्षात सर्वाधिक 2 हजार 518 रुग्ण मिळाले होते. ऑक्‍टोबरमध्ये वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचे एक हजार 90 रुग्ण मिळाले होते. नोव्हेबरमध्ये 384, डिसेंबरमध्ये 596 रुग्ण मिळाले. जानेवारी 2021 मध्ये 363 रुग्ण मिळाले. फेब्रुवारीत 198 रुग्ण मिळाले. मार्चमध्ये रूग्णसंख्येने पुन्हा उसळी घेतली. 680 रुग्ण मिळाले आहेत.

ज्येष्ठांचा मृत्यूदर जास्त

31 मार्च पर्यंत जिल्ह्यात 183 मृत्यू आहेत. यात सुदैवाने 10 वर्षांपर्यंत एकही मृत्यू नाही. 11 ते 20 वयोगटांत दोन, 21 ते 30 गटात दोन, 31 ते 40 गटात 9, 41 ते 50 गटात 14, 51 ते 60 गटात 45 मृत्यू आहेत. सर्वाधिक मृत्यू 61 ते 70 गटात 61 झाले आहेत. पाठोपाठ 71 वर्षांवरील 50 मृत्यू आहेत. यामध्ये 72 टक्के मृत्यू पुरुष तर 28 टक्के मृत्यू महिलांचे आहेत.

 

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक मृत्यू

जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये कोरोना बळी एकही नव्हता. मे महिन्यात एक, जूनमध्ये 5, जुलैत एक, ऑगस्टमध्ये 16, तर सर्वाधिक सप्टेंबरमध्ये 74 मृत्यू आहेत. ऑक्‍टोबर 32, नोव्हेंबर 15, डिसेंबर 13 असे मृत्यू आहेत. जानेवारी 2021 मध्ये 11, फेब्रुवारी 6 व मार्च 9 असे मृत्यू आहेत.

 

वयानुसार आढळलेले रुग्ण

वयोमान *कोरोनाग्रस्त

*0-1*10

*1-10*302

*11-20*600

*21-30*1196

*31-40*1399

*41-50*1307

*51-60*1117

*61-71*769

*71 वर्षांवरील*422

*एकूण*7122

जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेल्या रुग्णांमध्ये वयाचा विचार केल्यास तरुण वर्गाला कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणात झाली होती. तरुणाई बाधित झाली असली तरी मृत्यू दरात ही आकडेवारी नाही. जिल्ह्यात जे कोरोना मृत्यू झाले आहेत. त्यातील बहुतांश रुग्णांना अन्य गंभीर आजार होते.

– डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक

 

प्रतिक्रिया व्यक्त करा