खाडीपात्रातील आंदोलनावर रेवंडी ग्रामस्थ ठाम…!

खाडीपात्रातील आंदोलनावर रेवंडी ग्रामस्थ ठाम…!

५ एप्रिलला ग्रामस्थ खाडीत उतरणार

मालवण :

खालची रेवंडी किनाऱ्या लगत कांदळवन व पतन विभागाच्या बंधाऱ्यांची तोड करून काही व्यक्तींनी खाडीपात्रात अतिक्रमण केले. या प्रश्नी निवेदने देऊनही पतन विभाग, वन विभाग, बंदर विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने आम्ही रेवंडी ग्रामस्थ यापूर्वीच जाहीर केल्यानुसार सोमवार ५ एप्रिल सकाळी १० वाजता रेवंडी खाडीपात्रात उतरून आंदोलन छेडणार आहोत. अशी माहिती माजी सरपंच युवराज कांबळी यांनी दिली आहे.

दरम्यान, रेवंडी ग्रामस्थांच्या भूमिकेला तळाशील व सर्जेकोट ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. अशी माहितीही युवराज कांबळी, सचिन मोर्वेकर, विजय कांबळी यांनी दिली.

आमच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधणार आहोत. कोरोना काळ पाहता खबरदारीचे सर्व नियम आम्ही पालन करणार आहोत. असेही कांबळी यांनी स्पष्ट केले.

खाडीपात्रात जांभा दगड व माती टाकून मार्ग तयार केला जात आहे. खाडीचा प्रवाह बदलला जाऊन गावे उधवस्थ होण्याची भीती आहे. याबाबत ग्रामपंचायतीने विरोध दर्शवला, प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. शासकीय पंचनामे झाले. कांदळवन व बंधारा तोड झाल्याचे स्पष्टही झाले. मात्र अद्याप कारवाई का झाली नाही ? गुन्हे का दाखल झाले नाहीत ? याचा खुलासा वन विभाग व पतन विभागाने घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या समक्ष करावा. असेही कांबळी यांनी स्पष्ट केले आहे.

कांदळवन तोड हा गंभीर गुन्हा असताना शासकीय पंचनामे होऊनही वन विभाग कारवाई का करत नाही ? पतन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या बंधाऱ्यांची तोड झाल्याचे पंचनाम्यात स्पष्ट होते मात्र पुढील कारवाई पतन विभाग का करत नाही ? असे सवाल उपस्थित करत वन विभाग व पतन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे युवराज कांबळी यांनी माहिती देताना सांगितले.

खाडीतील पाण्यात उतरावेच लागणार

रेवंडी किनारी ज्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी खाडीपात्रात आंदोलन छेडले जाईल. कांदळवन व बंधारा तोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. खाडीतील अतिक्रमण तात्काळ हटवले जावे. या प्रमुख मागण्या असल्याचे युवराज कांबळी यांनी माहिती देताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा