तिघा युवकांनी गोव्यातील कॅसिनो चालकाला फसविले

तिघा युवकांनी गोव्यातील कॅसिनो चालकाला फसविले

बांदा

गोव्यात कॅसिनोमध्ये जुगाराच्या लाखो रुपयांच्या पैशाचा अपहार करून मोटारीने सुसाट वेगात मुंबईच्या दिशेने पलायन करणाऱ्या तिघा युवकांना कॅसिनो चालकाने बांद्यात गाठून बेदम चोप दिल्याची घटना बुधवारी रात्री घडली. कॅसिनो चालकाने पैसे वसूल करत गोवा गाठले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील तीन युवक जीवाचा गोवा करण्यासाठी महिन्याभरापूर्वी गोव्यात आले होते. या युवकांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवर एका गावात भाडेतत्वावर खोली घेतली आहे. बुधवारी सकाळीच हे युवक पणजीतील आलिशान कॅसिनो मध्ये खेळण्यासाठी गेले होते.

मद्याच्या नशेत या युवकांनी सायंकाळी उशिरा कॅसिनो मधील लाखो रुपये हडप करून आपल्या मोटारीतून बांद्याच्या दिशेने पलायन केले. कॅसिनो मधील सीसीटीव्ही फुटेज मध्ये तिघे संशयित युवक कैद झाल्याने कॅसिनो मालकाने आपल्या सहकाऱ्यांसह तिघा युवकांचा पाठलाग केला.

सुसाट वेगात पळून जाणाऱ्या या युवकांच्या मोटारीचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने कॅसिनो मालकाने त्यांना रात्री उशिरा गाठले. याठिकाणी बाचाबाची झाली. कॅसिनो मालकाने तिघा युवकांना बेदम चोप दिला. युवकांनी हडप केलेले पैसे परत घेतले. याची चर्चा बांदा शहरात सुरू होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा