You are currently viewing नागरिकांनी पाणी बचतीचा मार्ग स्वीकारावा..

नागरिकांनी पाणी बचतीचा मार्ग स्वीकारावा..

अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांचे आवाहन;जिल्हा परिषदेत जागतीक जलदिन साजरा

सिंधुदुर्गनगरी

पाण्याचा बेसुमार वापर टाळणे, वाहते पाणी जमिनीत मुरविणे हाच पाणी बचतीचा मार्ग आहे. याची सुरुवात प्रत्येकांने स्व:ता पासुन करावी, असे प्रतिपादन श्री. राजेद्र म्हापसेकर, अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी जागतिक जल दिनांचे औचित्य साधुन आयोजित केलेल्या जल पुजन व जल शपत कार्यक्रमांत केले. जागतिक जल दिनांचे औचित्य साधुन जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हास्तरीय जलपुजन व जल शपथ कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले.

यावेळी राजेद्र म्हापसेकर, अध्यक्ष, जि. प. सिंधुदुर्ग,  प्रजीत नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग,  राजेद्र पराडकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग,  विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जि. प. सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवराच्या हस्ते राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच जल पुजन व दिपप्रज्योलन करुन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष श्री. म्हापसेकर म्हणाले की, पृथ्वीवर 70 टक्के पाणी व 30 टक्के भुभाग आहे. मात्र शेती व तहान भागविण्याकरीता लागणारे पाणी हे 1 टक्का आहे. पावसाळ्यात आपल्या जिल्ह्यात सुमारे 4500 मिलि लिटर पाऊस पडतो मात्र सर्व पाणी हे समुद्रास जाऊन मिळते. पावसाच्या पाण्याची जिल्ह्यात असणा-या चिरेखाणीत साठवणुक केल्यास जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढु शकते असे त्यानी यावेळी सागितले. यावेळी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले कि, आज जागतिक जलदिनांचे औचित्य साधुन सर्वानी जलशपथ घेतली आहे. स्व:ता पासुन सुरुवात करुन पाणी बचत करणे गरजेचे आहे. पाण्याचा बेसुमार वापर होत राहिला तर भविष्यात मोठे संकट उभे राहणार आहे. पाण्याचे सोर्स वाचविण्यासाठी ‘कॅच द रेन’ या संकल्पनेतुन पावसाचे पाणी भुगर्भात सोडणे गरजेचे आहे. या बाबत शासन काम करित असुन जिल्हावासियांनी आपली जबाबदारी या भावनेतुन पाऊस पाणी संकलनाकरीता सहभाग घेणे गरजेचे आहे.

यावेळी श्री. राजेद्र पराडकर यांनी बोअरवेल पुनर्भरण केल्याने होणारे फायदे व मालवण तालुक्यात बोअरवेल पुनर्भरण केल्यावर झालेले फायदे याबाबत उपस्थितानां मार्गदर्शन केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) विनायक ठाकुर यांनी या कार्यक्रमांचे प्रास्ताविक करताना जलजीवन मिशन, पाण्याचा वापर, भविष्यातील धोके याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवर, जि. प. सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांना जल शपथ देण्यात आली. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन निलेश मठकर, पाणी गुणवत्ता निरिक्षक यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा