विटे/ प्रदीप जोशी :
कोयनेच्या पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली असताना जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी जनतेमध्ये संभ्रम का निर्माण करत आहेत? कोयनेच्या पाण्याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट आहे. टेंभू-म्हैसाळ- ताकारी योजनांच्या पाण्यात कोणतीही कपात अथवा तडजोड होणार नाही. सवंग लोकप्रियतेसाठी जनतेची कोणीही दिशाभूल करू नये. असे मत भाजपचे युवा नेते वैभव पाटील यांनी व्यक्त केले.
कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याच्या विनियोगाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली असतानाही सांगली जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींकडून या विषयावर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत. शासनाची भूमिका आणि वस्तुस्थिती पूर्णपणे समजून न घेता केवळ सवंग लोकप्रियतेसाठी जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही, अशी भूमिका भाजपचे युवा नेते वैभवदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ABP माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोयना प्रकल्पातील पाण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ६० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. या पाण्याचा सध्या कोणताही उपयोग होत नसल्याने त्याचा विनियोग कसा करता येईल, याचा शासन अभ्यास करत आहे. हे पाणी मुंबईकडे आणता आले, तर कोकणातील विविध प्रकल्पांवरील पाण्याचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. यासाठी तांत्रिक बाबींचा अभ्यास आणि नियोजन सुरू आहे.
मात्र, या संपूर्ण विषयाचा चुकीचा अर्थ लावून दुष्काळी भागातील जनतेच्या मनात पाण्याबाबत भीती निर्माण करणे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेला विषय हा वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याच्या अतिरिक्त विनियोगाचा आहे. सध्या दुष्काळी भागाला मिळणाऱ्या पाण्याचे फेरवाटप करण्याचा हा विषय नाही.
दुष्काळी भागाच्या पाणीहक्काशी कोणतीही तडजोड होणार नाही असे सांगून ते म्हणाले, ” सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ यांसारख्या दुष्काळी भागासाठी टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी या सिंचन योजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाण्याच्या हक्कामध्ये कोणतीही कपात किंवा तडजोड केली जाणार नाही. या योजनांची आवर्तने नियमित सुरू ठेवून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याला शासनाचे प्राधान्य आहे.
दुष्काळी भागाला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. मात्र, अतिरिक्त पाण्याच्या नियोजनाचा विषय आणि सध्या सुरू असलेल्या सिंचन योजनांचे पाणी या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यांची गल्लत करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये.
सवंग लोकप्रियतेपेक्षा जनतेला वस्तुस्थिती सांगण्याची जबाबदारी महत्त्वाची आहे असे नमूद करून ते म्हणाले ” लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर कोणतीही भूमिका मांडताना शासनाचे अधिकृत स्पष्टीकरण आणि वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेनंतरही काही लोकप्रतिनिधींकडून वेगवेगळ्या प्रकारची विधाने करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असेल, तर त्यातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होऊ शकते.
केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी पाण्यासारख्या संवेदनशील प्रश्नाचे राजकारण करणे योग्य नाही. जनतेला वस्तुस्थिती सांगणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. प्रसिद्धीसाठी वक्तव्ये करण्यापेक्षा दुष्काळी भागातील प्रलंबित सिंचन प्रश्न, पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
पाणीप्रश्नावर राजकारण नको शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य हवे असे सांगून ते म्हणाले, ” कोयनेचे समुद्रात वाहून जाणारे पाणी उपयोगात आणण्याचा शासनाचा विचार आणि दुष्काळी भागाला टेंभू-म्हैसाळ योजनांमधून पाणी देण्याची प्रक्रिया या दोन्ही गोष्टी राज्याच्या जलहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. उपलब्ध जलसंपत्तीचा अधिकाधिक उपयोग करताना दुष्काळी भागाच्या पाणीहक्काचे संरक्षण झालेच पाहिजे.
आमची भूमिका स्पष्ट आहे – दुष्काळी भागाचे पाणी कमी होऊ देणार नाही आणि उपलब्ध अतिरिक्त पाणी वाया जाऊ देण्याऐवजी त्याचा योग्य विनियोग करण्याच्या प्रयत्नांना विरोधही करणार नाही. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करण्याऐवजी वस्तुस्थिती समजून घेऊन शेतकरीहिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन वैभवदादा पाटील यांनी केले.
