You are currently viewing सावंतवाडी-वेंगुर्लेच्या विकासासाठी केसरकरांकडून निधीचा वर्षाव; रखडलेल्या नळपाणी योजनेवरून संजू परब आक्रमक!
Oplus_16908288

सावंतवाडी-वेंगुर्लेच्या विकासासाठी केसरकरांकडून निधीचा वर्षाव; रखडलेल्या नळपाणी योजनेवरून संजू परब आक्रमक!

दोन्ही नगरपरिषदांसाठी १२ कोटींसह अन्य विकासकामांनाही निधी; ५७ कोटींची नळपाणी योजना आठ दिवसांत सुरू करण्याचा अल्टिमेटम

सावंतवाडी : सावंतवाडी आणि वेंगुर्ले शहरांच्या विकासासाठी आमदार दीपक केसरकर यांनी विविध विकासकामांसाठी भरघोस निधी मंजूर करून आणला आहे. दोन्ही नगरपरिषदांसाठी एकूण १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, सावंतवाडीतील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या दुसऱ्या टप्प्यासाठीही ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील मोती तलावातील गाळ उपसा, सार्वजनिक विहिरी आणि बंधाऱ्यांच्या कामांसाठीही निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, दुसरीकडे शहरासाठी महत्त्वाची असलेली ५७ कोटी रुपयांची नळपाणी योजना गेल्या सात महिन्यांपासून रखडल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या आठ दिवसांत या योजनेचे काम सुरू न झाल्यास नगरपरिषदेवर धडक देऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी दिला.

सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. आमदार केसरकर यांनी सावंतवाडी आणि वेंगुर्ले या दोन्ही शहरांच्या विकासाला चालना दिली असून, ते विकासपुरुष आहेत. त्यांच्या कामाचा आपल्याला अभिमान असल्याचे परब यांनी सांगितले.

दोन्ही नगरपरिषदांसाठी मंजूर झालेल्या १२ कोटी रुपयांच्या निधीमध्ये सावंतवाडी शहरातील गवत मार्केट नूतनीकरणासाठी ९ कोटी रुपये, वेंगुर्ले मच्छीमार्केट विस्तारीकरणासाठी २ कोटी रुपये आणि नमो उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा समावेश आहे. तसेच सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई इमारतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शहरातील विविध सार्वजनिक विहिरींच्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठीही निधी उपलब्ध झाला आहे. महादेवाचे भाटले येथील नरेंद्र देशपांडे यांच्या घराजवळील सार्वजनिक विहिरीच्या नूतनीकरणासाठी २० लाख रुपये, सिद्धीवाडा येथील विहिरीच्या दुरुस्तीसाठी ५ लाख रुपये, सबनीसवाडा-डोंगरे पाणंद येथे सार्वजनिक विहीर बांधण्यासाठी २० लाख रुपये, झिरंग नाईकवाडा येथील विहिरीच्या दुरुस्तीसाठी ५ लाख रुपये, सालईवाडा सर्वोदय नगर येथील प्रणय नाईक यांच्या घरासमोरील खुल्या जागेत विहीर बांधण्यासाठी २० लाख रुपये, झिरंग दत्तनगर येथील परेश बाबकर यांच्या घराजवळील ओहोळावर बंधारा बांधण्यासाठी १० लाख रुपये, तर वेदिका अपार्टमेंटसमोरील खुल्या जागेत सार्वजनिक विहीर बांधण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती परब यांनी दिली.

दरम्यान, सावंतवाडी शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मोती तलावातील गाळ उपसा करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे तलावाच्या संवर्धनाला चालना मिळणार असून, शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.

मात्र, जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता सावंतवाडीची नळपाणी योजना रखडणे ही गंभीर बाब असल्याचे परब यांनी सांगितले. कंत्राटदाराकडे आवश्यक यंत्रणा, साहित्य आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध असतानाही गेल्या सात महिन्यांपासून योजनेचे काम बंद आहे. हे काम नेमके कोणाच्या सांगण्यावरून आणि का थांबविण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

योजनेसाठी ज्या भागांमध्ये खोदकाम करून पाइपलाइन टाकण्यात आली होती, त्या ठिकाणी सध्या रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेता ही योजना वेळेत पूर्ण झाली असती, तर शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला असता, असे परब म्हणाले.

कंत्राटदाराकडे आवश्यक साहित्य आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध असतानाही नगरपरिषदेच्या नळपाणी विभागाकडून काम पुढे नेले जात नाही. याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता योग्य आणि समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुढील आठ दिवसांत योजनेचे काम पूर्ववत सुरू करावे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने नगरपरिषदेवर धडक देत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा ठाम इशारा संजू परब यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला नगरसेवक देव्या सूर्याजी, अजय गोंदावळे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक तसेच शिवसेना पदाधिकारी बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा