You are currently viewing भाजपाने पदराआडून तीर मारायचे धंदे बंद करावेत – नगरसेवक कन्हैया पारकर

भाजपाने पदराआडून तीर मारायचे धंदे बंद करावेत – नगरसेवक कन्हैया पारकर

कणकवली

युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या नितेश राणे यांचा निषेध शिवसैनिकांनी केला. आम्ही हे छातीठोकपणे सांगतो, आणि त्याची जबाबदारीही घेतो. मात्र आम्ही आमदारांचा निषेध केला म्हणून युवा सेना जिल्हा प्रमुख श्री गितेश कडू यांना निलंबित करा अशी मागणी जमाव करून अधिकाऱ्यानं बरोबर हुजतं घालण्या साठी विभाग नियंत्रक कार्यालयात केलेल्या बेकायदा जमावाची जबाबदारी भाजपचे शेंदाड शिपाई घेणार आहेत की नाही ? ती जबाबदारी घेण्याची त्यांना भीती वाटते आहे का ? की त्यांचे आंदोलन आमदारांना खुश करण्यासाठी होते ? असा खोचक सवाल पारकर यांनी केला आहे.

आक्रमकपणा हा शिवसेनेचा स्वभाव आहे. आमच्या नेत्यांवर बेछूट आरोप करणाऱ्या प्रत्येकाचा आम्ही लोकशाही मार्गाने निषेध करू. आमच्या पदाधिकाऱ्यांनी तो केला. आम्ही ते छातीठोकपणे कबूल करतो. “मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली” हे भाजपचे धंदे आम्हाला जमले नाहीत आणि जमणारही नाहीत.

मात्र आमच्या निषेध आंदोलनाचा बाऊ करून भाजपचे नेते आणि कार्यकर्ते बेकायदा जमाव करून विभाग नियंत्रकांच्या कार्यालयात गेले. आमच्या युवासेना जिल्हा प्रमुखांवर कारवाईची मागणी केली. या आंदोलनाची त्यांनी परवानगी घेतली होती का ? या आंदोलनाची जबाबदारी भाजपचे नेते घेणार आहेत का ?

आता भाजपच्या शेंदाड शिपायांनी विषयाला भलतेच वळण लावायला सुरुवात केली आहे. पालकमंत्री, खासदारांवर कारवाईची मागणी त्यांच्याकडून होत आहे. याला “विषय भलतीकडे नेणे” असे म्हणतात.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आमदाराला खुश करण्यासाठीच आंदोलन केले होते आणि ते दिखाऊ होते, असा त्याचा अर्थ आहे. वाहतूक नियंत्रक कार्यालयात केलेल्या बेकायदा जमावाची जबाबदारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारावी अन्यथा हे आंदोलक भुरटे आणि बेजबाबदार आहेत याची खात्री आमदारांना कळेल आणि आमदार या कार्यकर्त्यांवर कधीही विश्वास ठेवणार नाहीत, हे नीट लक्षात ठेवावे असा टोलाही कन्हैया पारकर यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =