शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्ग
क्रीडा विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ट क्रीडापटू तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांच्या पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडामहर्षींसाठी जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच खेळाडू, साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू व व्यक्ती आणि दिव्यांग खेळाडूंसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासन निर्णय दिनांक २९ डिसेंबर २०२३ व २५ जानेवारी २०२४ अन्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली २०२३ निश्चित करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या वर्षांच्या पुरस्कारांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमात सहभागी झालेल्या खेळाडू व व्यक्तींकडून १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
मात्र, इच्छुक अर्जदारांना अर्ज सादर करण्यासाठी १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांनी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजून ५९ सेकंदांपर्यंत केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्यासाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.
जिल्ह्यातील पात्र क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
