You are currently viewing निवडणूक

निवडणूक

*काव्यप्रेमी महाराष्ट्र साहित्य समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित ग्रामीण ढंगातील कथा*

 

*निवडणूक*

 

गराम पंचायतीची निवडणूक लागलेली. मग काय ssss चिचच्या सावलीला…… वडाच्या झाडाखाली….. इसीच्या कट्ट्यावर….. चावडीच्या म्होरं…… आडाच्या कटड्यावर……गल्ली बोळात, पाटलाच्या वाड्यावर चर्चेला ऊत आलेला.इटलनानाचा काळ जरा सुधारलेलाच म्हणाकी, टुकटुकी गीली अण् लाईट आली. तवापसून पिटाची गिरणी त्यांच्याकडच, फट फट वाजणारी फटफटी त्यांच्यातच, हलर त्यांच्यातच, दुबत्या गायी आन म्हशी त्यांच्यातच. शेतात वासरं जनावरं कंच न्हाई आसं न्हाईच. संमदी पिकं. शेतात पाणी भरपूर .ऊस, गहू ,हरभरा, जोंधळा,आव काय म्हणायचं ssss लक्ष्मी दारात उबाच.इतकी भरभराट झालेली की सांगूच नका. इटलनानाचा मदवा पोरगा त्याचं नाव केसवा. धाराशिवला जाऊन बरीच सालं शिकलेला. त्याचं बोलणं काय ssss त्यांचा रुबाब काय sss.गावात आला म्हंजी फटा फटा करीतच गाडी येयची. ह्या टायमाला मातर समदया पोरानी केस्वाला सरपंच करायचा चंगच बांदलेला. जिथं बगल तिथं केसवाच्या नावाची चर्चा. एका दिवसी वडाच्या झाडाखाली चार सा जनं तमाकु खात बसलेले. तुका नानानं जगतापाच्या कुशाला तमाकू मागितली. छाती वर करून कुशान तमाकू आन हिरवी चुन्याची डबी अशी रुबाबात फिकली. तीच तुका नानानं दूनी हातानं झेल्ली. एकाच्या नादानी एक अशा समद्यांनीच पान तमाकु खाल्ल.वाघमाऱ्याचा चंद्या दारूच्या नसेत डुलत डुलत पाय फरकांड्या मारीत जवळ आला. कुनब्याचा रामन्या, उगल्याचा नाण्या दोघांच्या मदी दूनी हातानी दोगाली सारून बसला. त्या दोगानी जागा द्यायच्या आत जागा बळकीवली. समद्याच्याच तोंडावर दारूचा भपकारा गेला.

तवर तीन-चार जणांनी नाक तोंड वाकडी तिकडी किली. मग ईषय निघलाच. हुईल तर हुईल पण ह्या वक्ताला केसवाच सरपंच हुईल.त्यालाच सरपंच करायचा म्हणजी करायचा .तुकानाना मदीच म्हणला!!! ये sss येडझव्यानु हे काय नविनच? आर त्या पोराच्या तोंडावर मिसरूट तरी फुटलय का? उगच कायबी ssss.आर !!! सरपंच शिकला सवरलेला असावा .फटफटी चालविली म्हजी सरपंच व्हता येत नसतं…..आर गाव हाकायला अक्कल लागतिया का न्हाई!!! गाव गाडा चालवायचा म्हजी पोरा स्वराचं काम न्हाई…. गेल्या टायमाला जो सरपंच व्हता त्यालाच निवडून द्या की ssss.रामान्या म्हंला, आव नाना तुम्हाला काय माहितीये ssss .त्योव लै शिकलाय. वकीली शिकलाय वकीली!!!!उग हाय का काय? जा जा झक मारा करा त्यालाच करा सरपंच.तुकानाना रागात बुलून चालता झाला. हो नाही करीत एक एक निघून गेले. आठ दिवसावर फारम भरायचा दिवस आला. पाटलाच्या वाड्यावर संमदी पोरं जमा व्हायला लागली. बाया गड्याची यादी कागदावर लिहून काढली. गावातल्या बायाचे नवरे पुढ पुढ करीत व्हते. बाया मातर घरातच. कोणच्याच बायांली फारम भरलेला/ भरायचा कायबी माहित न्हवतं गड्याचीच तुरमंड. माझ्या बायकुचा की तुझ्या बायकुचा. चर्चेला रंग येत व्हता.

. आज मातर लोकं वाड्यावर जमली की तात्याबा उठला. आणि बोल्ला. हेवका पोरानू तुम्हाला सांगतो. आता समद्या जातीत गड्या बायाचे फारम भरावे लागतेल.सरकारनी लै नियम काडलेत. आरद्या बाया आन आर्द गडी. समद्या जातीत एक एक माणसं, बाया घीऊन यादी बनवा. मग काय लगेच पहिली यादी फाडून मग दुसरी तयार कीली. आन फारम भरायच्या दिवशी सकाळी नारळ फुडून मगच फारम भरायला जाऊ अशी चर्चा झाली. मग काय पहिला नारळ कोंच्या देवाला फोडायचा म्हणून चर्चा सुरू झालं. धनगराचा केरबा म्हणला मारुतीलाच नारळ फोडू पहिला. मग देवीला फोडायचा. आन एक बक्र कापायचं. बकरं म्हणलं की समद्याच्या तोंडाला पाणी सुटलं.केरबाचा बाप तर हुरूळूनच गेला. पोरगं सरपंच व्हणार म्हणून त्याला दिवसांबी सपनं पडायला लागली. माणसं जमलेली बगुन धोतराचा खोशा सावरीत वाकडा झालेला रुमाल दुनी हातानी सरळ केला. पानाची पिचकारी मारली अनं चोथा डाव्या हाताच्या बोटानी काडून बाहीर फेकला.मग उभा राहून बोलला. आर एकच काय पाच बकरी देवाला कापूकी sss.असं म्हणल्यावर चंद्या उटला जोरानं घोस्ना दिली केसवा भाऊचा विजय असो ssss. जमलेल्या माणसाला लै जोस आला .घोषना झाल्यावर तर काय आरध गाव जमा झालं.मग काय!!झाली पोराची तयारी सुरू.समदी कामाला लागली. चार्जनं मीटा कुटाला लागली. तर दोन जण तडवळ्याच्या बाजारला गिली. पाच बोकड डोक्याच्या महावीर कडून ईकत घेतली… देवाला कापायची म्हणल्यावर तेंनबी दाम कमीच घेतला. दिवस मावळोस्तर संमदी तयारी झालेली.मग का बोकडाची चर्चा गावभर पसरली. रात्री चार-सहा बायांनी काळं तिखट कुटून तयार केलं. त्याला आमी ईसरू म्हणतो.रामपाऱ्यात एक एक माणूस वाड्यावर जमत व्हय व्हता. वाजंत्र्याला सांगावा धाडला. तसं वाजंत्री झपाझप एका म्हागं येक पावलं टाकीत पिपाणी, ढोल, बेंडबाजा घेऊन आले. दारा म्होरं बसले. पोरांची गर्दी सुरू झाली. बाजूला पाच बकरी ब्या ब्यां करून वरडत व्हती.निगायची तयारी झाली. घराच्या उंबऱ्यावर उभारून कीशा म्हंला ये वाजंत्र्याहो आर फुका की sss…तस म्हणल्याबरूबर वाजंत्र्यानी वाजवायला सुरू केलं. टणक पाच पोरांनी एक एक बकर हातात धरलं .त्या बकऱ्याला हार घालून कुकू लावूलं.वाजवित गाजवीत देवीच्या मंदिराकड गेले. जातानी बकरी लावणाऱ्या मुलान्याला हाक मारायची राहून गिली.मधेंच धनगराचा मारत्या म्हणला आर मुलाण्याला बोलऊन घ्यार कोणी तरी. आसं म्हणल्यावर किंच्या म्हंला तुम्ही व्हा पुढ. मी आणतो जाऊन. लगेच किंच्यानं टोपीला हातानी सावरलं. धोतर हातात धरून पळतच मुलान्याच्या घरला गेला. दारात उभा राहून हाक मारली.ये ssss मामु आर चलकी ssss बकरी लावयचीत.मामू आता थकलेला व्हता.वय झालं व्हतं. तरुणपणात कसलबी बोकड आसलं तर, निस्त तोंडाला धरलं की बोकड ब्या करायच्या आत त्याचं नरडं सोडवायचा.निबर गडी व्हत.पर त्याच्या आंगाचा लै वकटा झ्यार वास यायचा .सारखी बकरी कापून त्याच्या आंगवर सार रगतचं असायचं.मग काय मामू कोपटातुंच होय होय म्हणून दोन सूऱ्या मळकटलेल्या कपड्यात गुंडाळून एका मागे एक देवीच्या मंदिराकडे आले. संमदी लोक मामुची वाट बघत थांबलेली.नारळ फोडला आन आता बकरी कापायची तयारी झाली. तेवढ्यात पोलीस गाडी हारण वाजवीतच मंदिरा म्होरं आली. ड्रायव्हरनं करकन बिरेक दाबलं.आन बकाबका पोलीस गाडीतून उतरले. समद्याच्या शेवटी पोलिसाचा साहेब खाली उतरला. काय हा परकार ??? म्हणून त्यांनी केसवाच्या बापाला ईचारल. केस्वाचा बाप हात जुडून काय नाही साहेब.पोरगा सरपंचकीला उभारलाय म्हणून बकरी कापायचेत. साहेब रागात भडकला. कोण कोण हैत त्या समद्यांना जीपीत कोंबा. धरा रं समदयाली. असं म्हणल्यावर पोरं बकऱ्याला सूडून धूम फरार झाली. माणसं भेदरली. थरथरली. बाया तोंडाला पदर लावून मागे सरल्या. काई काई लोक तर पळून गेले. एकदम जवळची माणसं थबकली. गर्बगळीत झाली. काय करावं समजना गेलं. काय झालं साहेब !!! आमचं काय चुकलं का ?म्हणून केरबाचा बाप साहेबाला बोल्ला. जे करताय ना sss ते चुकीचं हाय. हे समद बेकादेशीर करताय. म्हणून पोलिसाचा साहेब मोठ्याने शिव्या देऊन ओरडायला लागला. तेवढ्यात साहेबांचं पाय केरबाच्या वडिलांनी धरलं. साहेब म्हणले इलेक्शन चालू असताना तुम्हाला असले धंदे करता येणार नाहीत .तुमच्यावर केस होईल. असं म्हणल्यावर संमदी माणसं हादरली. केरबाच्या वडीलानी पाय धरले.काय बोलावं समजना. साहेब माफ करा. नाही नाही बोकडं कापणार न्हाई.बोकडाचा कार्यक्रम कॅन्सल करतो सायेब… म्हणून मापी मागितली.मग समद गाव म्हागारी फिरलं .ऐतखाऊ गिधाड्याच्या तोंडाला सुटलेलं पाणी तोंडातल्या तोंडात वाळून गेलं. तोंडावर चुलीचा पोतरा फिरावा तशी आवस्ता झालेली. आयाबायांना तर कायबी कळना. भराभरा करीत गल्लीबोळानी बाया पसार झाल्या. आली तशी गाडी निघून गेली. थोड्या येळानी एकेक करीत संमदी माणसं वाड्यावर जमली. ईसाबापू रागारागानं ईशीतून शिव्या देतच वाड्यावर निगाला. एका एकाला घोडा लावतो.नाही लावला तर नावाचा ईसा व्हणार न्हाई. जाणून-बुजून तुमी नागाच्या फण्याला हात लावलाय ना… तर मग ढसणारच. आमीबी बघून घिऊ अस म्हणत शिव्या देत देत वाड्यावर गेला. बघतो काय एका मागं एक माणसं जमली.रान तापलं.चर्चेला उधाण आलं.पोलिसात कुणी कागद दिला. संशय बळावला. विरोधी पार्टीच्या लोकांनी कागद दिला आसल.मग काल कोण कोण येरमाळ्याला गेलतं .चौकशी झाली. माजी सरपंचाचा पोरगा आन कुंडलनालाचा इट्या तेनी कागुद दिला म्हणून हेवढा खेळ झाला. हे कळल्यानंतर दहा-बारा पोरं काट्या कुराड्या घीऊन त्या दोन पोरास्नी हुडकायला निगले.तर तिकडच्यानिबी तयारी लावलेली व्हतीच. काट्याला काट्या, कूराडीला कुराडी भिडल्या.हानामाराचे आवाज गगणाल भिडले. जे व्हायचं तेच झालं. गाव माती, नातीगोती समदी धुरुलून गेली. गावची पांढरी माय लाल भडक झाली. राजकारणाचं व्हायचं तेच झालं….

 

✒️भूमिपुत्र वाघ

धाराशिव

प्रतिक्रिया व्यक्त करा