You are currently viewing सिंधुदुर्गात जाहीर कार्यक्रमांवर बंदी

सिंधुदुर्गात जाहीर कार्यक्रमांवर बंदी

ओरोस (सिंधुदुर्ग) 

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणूका, संमेलने यावर बंदीचा आदेश आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जारी केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आणखीही काही नवे आदेश जारी केले आहेत.

शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंध कायद्यातील तरतूदींनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्‍यक झाले आहे. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील आदोशानुसार त्या त्या जिल्हयातील परिस्थिती प्रमाणे संबंधित जिल्हाधिकारी यांना जिल्हयातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढण्याबाबत सर्वाधिकार देणेत आलेले आहेत.

राज्यात कोविड 19 संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोविड 19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि तातडीने काही उपाययोजना करण्यासाठी काही सूचनांचे काटेकोर पालन करणेबाबत निर्देशित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्वस्थापन प्राधिकरण के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड 19 चा प्रादुर्भाव फैलावू नये, यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

यामध्ये सर्व शॉपिंग मॉल, सिनेमागृह (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्‍सेस), हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मास्कचा वापर न करणाऱ्यास प्रवेश दिला जाणार नाही. तापमापीचा उपयोग करुन शरिराच्या तापमानाची नोंद घेण्यात यावी, सॅनिटायझर उपलब्ध ठेवावे, सर्व आस्थापनांच्यामध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्‍त करावे. या आदेशाचा भंग केल्यास संबंधित दंड वसूल करीत फौजदारी कारवाई होईल.

आदेश काय म्हणतात? 
*विवाह समारंभ 50 व्यक्तींची परवानगी
*तहसीलदारांची पूर्व परवानगी आवश्‍यक
*अंत्यविधी, अंत्ययात्रेत 20 जणांना परवानगी
*गृह अलगीकरणास नियम पाळून परवानगी
*कोविड रूग्णाच्या ठिकाणी 14 दिवसापर्यंत फलक लावावा
*पॉझिटीव्ह रुग्णांच्या हातावर गृह अलगीकरण शिक्‍का मारणे
*रूग्णाच्या कुटुंबीयांना गृह अलगीकरण आवश्‍यक
*अत्यावश्‍यक वगळता सर्व कार्यालये, आस्थापना 50 टक्के क्षमतेच्या अधिन राहून सुरू
* सर्व धार्मिक ठिकाणी सामाजिक अंतर राखणे
* भाविक, अभ्यांगतासाठी ऑनलाईन आरक्षण किंवा इतर सोयीच्या पद्धतींचा वापर करणे

  1. आदेश 31 मार्चपर्यंत 
    यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या व प्रतिबंधित केलेल्या बाबी, क्षेत्रे कायम राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश संलग्न राहतील आणि हे आदेश 31 मार्चपर्यंत अस्तित्वात राहतील

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =