कणेर येथे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी कला, संस्कृती, इतिहास आणि आरोग्यविषयक उपक्रम
पालघर (गुरुदत्त वाकदेकर): पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा, कणेर येथे जाणीव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ३० व ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘चला साजरी करूया प्रेमाची दिवाळी २०२६’ हा सामाजिक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत कला, संस्कृती, इतिहास आणि आरोग्याची ओळख करून देणे तसेच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. समाजातील देणगीदारांसह साईन पोस्ट इंडियाने कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत आर्थिक सहकार्य करून मुख्य प्रायोजकत्व स्वीकारले. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी रामचंद्र परब, सुनील पाठक आणि अजित सातोसे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.
पहिल्या दिवशी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, पणत्या रंगविण्याची स्पर्धा आणि ऐतिहासिक गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी कल्पकतेला वाव देत विविध कलाकृती साकारल्या. या स्पर्धांमुळे त्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळाले. मातीपासून गडकिल्ले तयार करताना विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वास्तू, स्वराज्याचा शौर्यशाली इतिहास आणि पराक्रमाच्या परंपरेची ओळख झाली. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत शाळेत प्रवेश केला. सकाळच्या परिपाठानंतर स्वयंसेवक प्राजक्ता लाडी यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे धडे देत आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य प्रायोजक साईन पोस्ट इंडियाचे अमर नडगिरी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा कणेरच्या माजी मुख्याध्यापिका शकुंतला पागी, रजनी कडू आणि संदीप पाटील यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक विनोद गवारे, साठ्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रांगोळ्या, पणत्या आणि गडकिल्ल्यांचे प्रदर्शन विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसाठी खुले करण्यात आले. यावेळी सामाजिक संदेश देणारी गाणी, कविता आणि आदिवासी तारपा नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पारंपरिक तारपा नृत्याने कार्यक्रमात विशेष रंग भरला.
जाणीव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आदिवासी पाड्यातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छता संचांचे (हायजिन किट) वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांची दिवाळी आनंददायी व्हावी, त्यांच्यात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि शिक्षणासोबत सामाजिक व ऐतिहासिक जाणीव विकसित व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व ट्रस्टी, स्वयंसेवक त्रिवेणी नडगिरी, गणेश मराळ, नुपूर गोसावी, नरेश पालव यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. साठ्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या १५ स्वयंसेवकांनीही उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचा उद्देश केवळ गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यापुरता मर्यादित नसून शिक्षण, संस्कार, आरोग्य, कला आणि सामाजिक जाणीव यांच्या माध्यमातून त्यांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे यासाठी संस्था विविध उपक्रम राबवित आहे. ‘शिक्षण, संस्कार, उज्ज्वल भविष्य’ हे ध्येय समोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रेमाची दिवाळी २०२६’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारशाची ओळख, कलात्मक अभिव्यक्तीचे व्यासपीठ आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. समाजातील विविध घटकांनी देणगी आणि वस्तूंच्या स्वरूपात केलेल्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांची दिवाळी आनंददायी झाली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून या उपक्रमाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित झाले. अशी माहिती जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे स्वयंसेवक नुपूर गोसावी यांनी दिली.
