दक्षिण कोकणची काशी सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव उद्या; लाखो भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर परिसर सज्ज!
लोटांगणाच्या नवसफेडीसाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून भाविकांची मांदियाळी; देवस्थान समितीकडून जय्यत तयारी
सावंतवाडी
‘लोटांगणाची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतून लाखो भाविक या जत्रोत्सवाला उपस्थित राहण्याची शक्यता असून, भाविकांच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे.
जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या पहाटेपासूनच श्री देवी माऊलीची विधिवत महापूजा, अलंकारिक सजावट तसेच विविध पारंपरिक धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. नवसपूर्तीसाठी देवीच्या चरणी लोटांगण घालण्याची परंपरा असल्याने या जत्रेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दर्शनासाठी आणि नवसफेडीसाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत.
भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दर्शन, वाहतूक आणि इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही भाविकाची गैरसोय होऊ नये तसेच जत्रोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी देवस्थान समिती, गावकर मंडळी, माऊली देवस्थान मुंबई मंडळ, पोलीस प्रशासन आणि वीज वितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सोनुर्ली माऊलीच्या जयघोषात उद्याचा जत्रोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडणार असून, लाखो भाविकांच्या उपस्थितीने सोनुर्ली नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
