सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला डॉ. हर्ष सागावकर यांच्याकडून पाच फाउलर बेडची देणगी
सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या बेडमुळे गरजू रुग्णांना मिळणार अधिक चांगली सुविधा
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील गोरगरीबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर यांनी त्यांच्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला रुग्णसेवेसाठी पाच नवीन फाउलर बेड देणगी स्वरूपात दिले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू व गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवेसोबत विविध रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले जाते. रुग्णसेवेसाठी फाउलर बेडचा तुटवडा जाणवत असल्याने संस्थेचे रवी जाधव यांनी डॉ. हर्ष सागावकर यांच्याकडे बेडची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत डॉ. सागावकर यांनी दुसऱ्याच दिवशी सुमारे ६० हजार रुपये किमतीचे पाच नवीन फाउलर बेड संस्थेला देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिले.
या बेडमुळे गरजू रुग्णांना संस्थेच्या माध्यमातून अधिक चांगली रुग्णसेवा मिळण्यास मदत होणार आहे. गरजू रुग्णांनी या रुग्णोपयोगी साहित्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, समीरा खलील व शेखर सुभेदार यांनी केले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी डॉ. हर्ष सागावकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.
फाउलर बेडच्या लोकार्पणप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, शेखर सुभेदार, आमीन खलील व रवी जाधव उपस्थित होते.
