मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने दुष्काळ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पर्यावरणतज्ज्ञ व भूगोल अभ्यासक प्रा. हसन खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कोकणात प्रथमच अशा स्वरूपाचा दुष्काळ जाणवत असल्याचे नमूद करत प्रा. हसन खान यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळाची कारणे, त्याचे पर्यावरणीय परिणाम आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे विश्लेषण केले. सन २०१५ मध्ये एल निनोचा प्रभाव असतानाही कोकणावर त्याचा तुलनेने कमी परिणाम झाला होता; मात्र सन २०२६ मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे कोकणातील संपूर्ण परिसंस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. सन २०१५ ते २०२६ या कालावधीत घडलेले विविध भौगोलिक बदल, सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील वृक्षतोड आणि जंगलतोड यांसारखे घटकही सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले. जंगलांचे घटते आच्छादन, नैसर्गिक जलचक्रातील बदल आणि पाण्याच्या उपलब्धतेवरील परिणाम लक्षात घेता सह्याद्रीच्या जंगलांचे संरक्षण व नैसर्गिक परिसंस्थांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमात प्रा. खान यांनी कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण कातळसडे व कातळ यांच्या पाणी साठवण क्षमतेचेही विश्लेषण केले. कातळसड्यांची भौगोलिक रचना, पावसाच्या पाण्याचे संचयन आणि पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहातील त्यांची भूमिका यांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कातळसडे हे केवळ भूशास्त्रीय वैशिष्ट्य नसून जलसंधारण आणि स्थानिक जलस्रोतांच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे त्यांनी पटवून दिले. या नैसर्गिक भूरचनांचे संवर्धन केल्यास पाण्याचे नियोजन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाचे पाणी साठवणे, जलसंधारणाची कामे करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे यांसारख्या उपाययोजनांद्वारे दुष्काळाच्या समस्येवर मात करता येऊ शकते, असेही प्रा. खान यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाबाबत जागरूक राहून समाजामध्ये पाणी बचतीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. कैलास राबते यांनी विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व विशद केले. पाण्याचा वापर जाणीवपूर्वक आणि काटकसरीने करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, येत्या डिसेंबर महिन्यात साळेल येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धन आणि सामूहिक कार्याची भावना विकसित होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. कैलास राबते, एनसीसी अधिकारी डॉ. एम. आर. खोत, प्रा. संकेत बेळेकर आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संकेत बेळेकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आणि नियोजनासाठी डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, अपूर्वा पालव, रिद्धी काजरेकर आणि हर्षद पाटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) स्वयंसेवक उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दुष्काळाची कारणे, जलसंधारणाचे महत्त्व, कातळसड्यांचे पर्यावरणीय योगदान आणि सह्याद्रीच्या जंगलांच्या संवर्धनाची आवश्यकता यांविषयी जागरूकता निर्माण झाली. तसेच, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय योगदान देण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.
