You are currently viewing बुद्धांचा धम्म म्हणजे मानवमुक्तीचा मार्ग; धम्म समजून घेऊन आचरणात आणा!

बुद्धांचा धम्म म्हणजे मानवमुक्तीचा मार्ग; धम्म समजून घेऊन आचरणात आणा!

बुद्धांचा धम्म म्हणजे मानवमुक्तीचा मार्ग; धम्म समजून घेऊन आचरणात आणा! वंदनीय भन्ते सचित बोधी यांची प्रभावी धम्मदेशना; दोडामार्ग येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाच्या पाच शाखा व गोवा विभागाचा संयुक्त उपक्रम; शेकडो अनुयायांची उपस्थिती, पदवीधरांचा गुणगौरव व ज्येष्ठांचा सन्मान

*साटेली भेडशी, प्रतिनिधी :*

तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्मविचारांचा प्रसार, सामाजिक समता, बंधुता, करुणा आणि मानवतावादी मूल्यांची जपणूक करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, मुंबई यांच्या वतीने आयोजित ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दोडामार्ग येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास शेकडो धम्म अनुयायी, महिला-भगिनी आणि समाजबांधव उपस्थित होते. महासंघाच्या कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग तालुका शाखा तसेच गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत मंगल कार्यालय, आंयी रोड, दोडामार्ग येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमात वंदनीय भन्ते सचित बोधी (अध्यक्ष, सम्यक संकल्प बहुउद्देशीय संस्था) यांनी प्रमुख धम्मदेशना दिली. सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष आयु. व्ही. ए. कदम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या समाजकल्याण सभापती रुहिता राजेश तांबे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महासंघाचे सल्लागार आयु. रमाकांत कृ. जाधव यांनी प्रमुख मार्गदर्शन केले, तर दोडामार्ग तालुका शाखेचे अध्यक्ष आयु. शंकर म. जाधव यांनी अध्यक्षस्थान भूषविले.

*बुद्ध, बाबासाहेबांचे विचार समाजाच्या घराघरांत पोहोचवा : रमाकांत जाधव :-* प्रमुख मार्गदर्शक आयु. रमाकांत कृ. जाधव यांनी आपल्या मनोगतात भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, सम्राट अशोकानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता, न्याय, शांती, प्रज्ञा, शील आणि करुणेचा विचार समाजात रुजविण्यासाठी मोठे योगदान दिले. हा विचार आपण सर्वांनी आचरणात आणून घराघरांत पोहोचविण्याची गरज आहे.
भगवान बुद्धांनी पंचशीलाच्या माध्यमातून मानवी मूल्यांची शिकवण दिली. बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार करून समाजात मैत्रीभाव, बंधुभाव आणि शांतता प्रस्थापित करता येईल. भारतीय संविधानाने दिलेली मूल्ये जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. बाबासाहेबांच्या विचारांनुसार सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास साधून त्यांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

*धम्म समजून घेऊन आचरणात आणा : भन्ते सचित बोधी :-*
वंदनीय भन्ते सचित बोधी यांनी आपल्या धम्मदेशनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि धम्मक्रांतीचा आढावा घेतला. सामाजिक विषमता आणि अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष करून वंचित समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दिला. १९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून लाखो अनुयायांना नवी दिशा दिली, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, बौद्ध धम्माचा स्वीकार करणे एवढेच पुरेसे नसून धम्म समजून घेणे, त्याचा अभ्यास करणे आणि दैनंदिन जीवनात त्याचे आचरण करणे महत्त्वाचे आहे. धम्मविषयक माहितीचा अभाव दूर करून धम्माचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे झाला पाहिजे. कुटुंबातील आणि समाजातील संघर्ष, मतभेद व दुःख कमी करण्यासाठी बुद्धांच्या मानवतावादी, नैतिकतावादी आणि विज्ञाननिष्ठ विचारांचा स्वीकार करणे आवश्यक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेला संदेश आणि जबाबदारी ओळखून प्रत्येकाने समाजपरिवर्तनाच्या कार्यात सहभागी व्हावे. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसोबतच धार्मिक व वैचारिक परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. बुद्धांच्या धम्माचा अभ्यास, आचरण आणि प्रसार यांद्वारे समाजात जागृती निर्माण करावी, असे आवाहन भन्ते सचित बोधी यांनी केले.

*वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील : रुहिता तांबे*
समाजकल्याण सभापती रुहिता राजेश तांबे यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे लाखो अनुयायांसह केलेल्या धम्मदीक्षेचे महत्त्व स्पष्ट केले. बाबासाहेबांनी वंचित समाजाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि वास्तववादी, विज्ञाननिष्ठ बौद्ध धम्म दिला. त्यांनी सुरू केलेल्या धम्मक्रांतीचा रथ पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. हा रथ पुढे नेता आला नाही, तरी तो मागे जाऊ देऊ नका, हा बाबासाहेबांचा संदेश सर्वांनी लक्षात ठेवावा, असे त्या म्हणाल्या.
समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या इतिहासाची जाणीव ठेवून शिक्षण, सामाजिक प्रगती आणि जागृतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिमापूजन, त्रिसरण-पंचशील आणि श्रद्धांजली
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून करण्यात आली. महासंघाच्या उपासकांनी सामूहिक त्रिसरण व पंचशीलाचे पठण केले. महासंघाचे दिवंगत पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाच्या दोडामार्ग तालुका शाखेचे उपाध्यक्ष आयु. अर्जुन आयनोडकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर केंद्रीय अध्यक्ष व्ही. ए. कदम, सरचिटणीस बी. एस. कदम आणि खजिनदार गोपाळ जाधव यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

*पदवीधरांचा गुणगौरव; ज्येष्ठ पदाधिकारी आणि धम्मसेवकांचा सन्मान*
या सोहळ्यात महासंघाच्या माजी तालुकाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. महासंघाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांमधील सेवानिवृत्त व्यक्तींचा सन्मान, पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच बौद्धाचार्य आणि श्रामणेर यांचा सन्मान करण्यात आला. वंदनीय भन्ते सचित बोधी यांच्या उपस्थितीत सामूहिक धम्मदीक्षा कार्यक्रमही संपन्न झाला.

*अध्यक्षीय मनोगतात आयु. शंकर म. जाधव* यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मानवतावादी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध धार्मिक व सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. धम्म बांधवांनी एकजुटीने समाजप्रबोधनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

*मान्यवरांची उपस्थिती :-*
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सुरेश कदम व मोहन परुळेकर, सरचिटणीस बी. एस. कदम, खजिनदार गोपाळ जाधव, चिटणीस राजन पावसकर व गुरुनाथ बांदेकर, सावंतवाडी तालुका शाखाध्यक्ष टिळाजी जाधव, कुडाळ तालुकाध्यक्ष अनिल पावसकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष प्रेमानंद जाधव, गोवा विभागाच्या उपाध्यक्ष वासंती परवार, कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगरसेविका ज्योती जाधव, सावंतवाडी महिला विभागाच्या अध्यक्ष प्रज्ञा जाधव, भारतीय बौद्ध महासभा दोडामार्ग तालुका शाखाध्यक्ष बुद्धभूषण हेवाळकर, भारतीय बौद्ध महासभा राजरत्न दोडामार्ग तालुका शाखेचे सचिव हरिश्चंद्र मणेरीकर, श्रामणेर अर्जुन कदम, सावंतवाडी शाखेचे सल्लागार तथा उपासक नारायण आरोंडेकर आणि महाराष्ट्र राज्य बौद्ध महिला संघाचे संस्थापक गणपत पन्हळेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासंघाच्या दोडामार्ग तालुका शाखेचे सचिव संदीप आनंद जाधव यांनी केले, तर खजिनदार प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.

या सोहळ्यास महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग शाखांचे पदाधिकारी, गोवा विभाग, महिला विभागाच्या प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, बौद्धाचार्य, श्रामणेर, विद्यार्थी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे दोडामार्ग तालुका शाखेने केलेले सुनियोजित आयोजन आणि व्यवस्थापन याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक करून अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा