You are currently viewing विशेष मोहीम ६ अंतर्गत २७ ऑक्टोबरला जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये ‘कायाकल्प’ उपक्रम

विशेष मोहीम ६ अंतर्गत २७ ऑक्टोबरला जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये ‘कायाकल्प’ उपक्रम

स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि आरोग्यदायी वातावरण निर्मितीवर भर

सिंधुदुर्ग : केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, विशेष मोहीम ६ (Special Campaign 6) अंतर्गत मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये ‘कायाकल्प’ हा एकदिवसीय राष्ट्रव्यापी उपक्रम राबविण्यात येणार आहे. आरोग्य संस्थांमधील स्वच्छतेचा दर्जा उंचावणे, जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि रुग्णांना सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.

या उपक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिरे तसेच आरोग्य उपकेंद्रांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य स्वच्छतेच्या विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, वॉर्ड, रुग्ण कक्ष, सार्वजनिक वापराची ठिकाणे आणि संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर भर

आरोग्य संस्थांमधील जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, संकलन आणि निर्धारित नियमांनुसार विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच परिसरातील अनावश्यक साहित्य आणि भंगार वस्तूंचे योग्य व्यवस्थापन करून उपलब्ध जागेचा सुयोग्य वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. या माध्यमातून आरोग्य संस्थांमधील स्वच्छता आणि व्यवस्थापनाचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.

संसर्ग नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना

आरोग्य संस्थांमध्ये संसर्ग प्रतिबंधक नियमांचे पालन, हात स्वच्छ धुण्याच्या पद्धतींची अंमलबजावणी आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

आरोग्य संस्थांचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धन

आरोग्य संस्थांच्या परिसरातील निरुपयोगी साहित्य काढून टाकणे, परिसर स्वच्छ व सुटसुटीत ठेवणे, उपलब्ध जागेचा प्रभावी वापर करणे आणि हरित क्षेत्राचे संवर्धन करणे यावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न परिसरामुळे रुग्णांना अधिक चांगल्या वातावरणात आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होईल.

सर्व आरोग्य संस्थांना सक्रिय सहभागाचे आवाहन

‘कायाकल्प’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि संसर्ग नियंत्रणासंबंधी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. आरोग्य संस्थांमधील स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता नियमित कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग बनावी. स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी आरोग्य संस्था निर्माण करण्यासाठी सर्व संबंधितांनी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा