You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘घर तिथे रोजगार’ अभियान यशस्वी करणार!
Oplus_16908288

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘घर तिथे रोजगार’ अभियान यशस्वी करणार!

कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्षा डॉ. सुनीता मोडक यांचे प्रतिपादन; महिलांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचे आयोजन

“सन्मान, आत्मनिर्भरता हाच स्त्रीचा शृंगार!” उन्मेषा दाभोलकर यांचे महिलांना स्वतः उद्योजिका होण्याचे आवाहन

कुडाळ / प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘घर तिथे रोजगार’ अभियान यशस्वी करायचे आहे. प्रत्येक गावातील रणरागिणींनी ही मोहीम हाती घेऊन वाटचाल करावी. भविष्यात ही चळवळ राज्यभर पोहोचली पाहिजे, असे प्रतिपादन कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिकच्या अध्यक्षा डॉ. सुनीता मोडक यांनी केले. उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘गाव तिथे रोजगार’ या कार्यक्रमात त्या कुडाळ येथे बोलत होत्या.

कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक आणि आश्रय प्रतिष्ठान, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कुडाळ एमआयडीसीच्या सहकार्याने रोजगारनिर्मितीनंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत महिलांसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथील दैवज्ञ भवन  समाज भवन येथे आज व उद्या हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सुनीता मोडक यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी फाइन आर्टिस्ट व क्राफ्ट ट्रेनर नाशिकच्या सौ. नंदिनी रामचंदानी, आश्रय प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव गोरे, माणिकर्णिका अध्यक्षा उन्मेषा दाभोलकर, सतीश पाथरूड, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे विवेक पंडित, रमाकांत नाईक, ज्येष्ठ महिला उद्योजिका रेश्मा जळवी, उमेश दाभोलकर, स्वाती पेडणेकर, मृणाल सावंत, कीर्ती पाटील, पूजा कुडव, सानिका सावंत, स्वप्नाली जळवी, दर्शना धुरी, दर्शना मार्गी, प्रियांका सुकाळे, वृंदा राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुनीता मोडक म्हणाल्या की, महिलांचे सबलीकरण होणे आवश्यक असून, त्यांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी कल्याणी आणि आश्रय प्रतिष्ठान काम करत आहेत. सामाजिक काम करताना अनेक अडचणी येतात; मात्र या अडचणींवर मात करून जो यशस्वी होतो, तोच खऱ्या अर्थाने स्पर्धेत टिकतो. चांगले काम करताना यश मिळण्यास उशीर होतो; परंतु ते यश चिरकाल टिकते. महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे. गावात रोजगार नसेल, तर रोजगारासाठी घर सोडून बाहेर जाण्याऐवजी रोजगार गावातच निर्माण झाला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. भविष्यात सर्वांना क्लस्टरमध्ये उतरायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा हा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला जिल्हा असून, येथे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. कुडाळ येथील पुरुषांची वटपौर्णिमा आणि दुर्गा दौड हे उपक्रम राज्यासाठी आदर्शवत आहेत, असेही डॉ. मोडक यांनी नमूद केले.

यावेळी उद्योजिका उन्मेषा दाभोलकर म्हणाल्या की, महिला शिवणकामाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा आधार निर्माण करू शकतात. सन्मानाने जगण्यासाठी आत्मनिर्भरता हाच स्त्रीचा खरा शृंगार आहे. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून स्वतः उद्योजिका होण्याचे स्वप्न साकार केले पाहिजे. महिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ. सुनीता मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण वाटचाल करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

या शिबिरात सौ. नंदिनी रामचंदानी यांनी फॅब्रिक पेंटिंग प्रशिक्षणांतर्गत कापडासाठी योग्य रंगांची निवड, ब्रशचा वापर, विविध चित्रकला तंत्रे, फुलांची पारंपरिक व आधुनिक डिझाइन्स, स्टेन्सिल तंत्र, रंगांचे मिश्रण आणि शेडिंग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कापडावरील रंग अधिक काळ टिकण्यासाठी योग्य पद्धतीने रंगकाम कसे करावे, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

तसेच क्रॉस स्टिचिंग, किचन फोटो फ्रेम, आरती थाळी, पिलर मेणबत्ती, स्तंभाकार मेणबत्ती, फॅन्सी दिवे, सुगंधी जार मेणबत्ती, पिलो बॉक्स, स्लाइडिंग बॉक्स, पेपर बॉक्स, ड्रॉवर बॉक्स, पटकोनी बॉक्स, विंडो बॉक्स, कागदी पिशव्या आणि एन्व्हलप तयार करण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना विविध कलाकौशल्ये आत्मसात करून स्वयंरोजगार सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महिलांनी आपल्या गावातच रोजगारनिर्मिती करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि ‘घर तिथे रोजगार’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरावी, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा