You are currently viewing आंब्रड येथे २२ ऑक्टोबरला कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबिर

आंब्रड येथे २२ ऑक्टोबरला कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबिर

आंब्रड येथे २२ ऑक्टोबरला कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबिर

मेगा ड्राइव्ह कॅम्पअंतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, कायदेविषयक मार्गदर्शनासह आयुष्मान व आभा कार्डची सुविधा

सिंधुदुर्ग

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रड येथे कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

            राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या १३ योजनांचा पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी २५ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आंब्रड येथे मेगा ड्राइव्ह कॅम्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गावातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी भेटी देऊन संभाव्य लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, कायदेविषयक हक्कांची जाणीव करून देणे आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

            या शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी, कायदेविषयक जनजागृती तसेच बालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. याशिवाय पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड व आभा कार्ड काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, विविध आजारांचे वेळीच निदान व उपचारांचे महत्त्व पटवून देणे आणि सर्वसामान्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, ही या शिबिराची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

            या उपक्रमासाठी तालुका विधी सेवा समिती, कुडाळ, कुडाळ बार असोसिएशन आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, कुडाळ यांचे सहकार्य लाभत आहे. शिबिरास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश एन. ए. बकरे, कुडाळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. जी. टी. पडते, कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील, उमेश गाळवणकर तसेच महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथील डॉ. प्रत्युश रं. बिस्वाल व डॉ. सुशांता समीर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

            या कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबिराचा आंब्रड आणि परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा