You are currently viewing पांढरी काठी म्हणजे स्वावलंबनाची दिशा; दृष्टिबाधितांना समान संधी द्या!

पांढरी काठी म्हणजे स्वावलंबनाची दिशा; दृष्टिबाधितांना समान संधी द्या!

पांढरी काठी म्हणजे स्वावलंबनाची दिशा; दृष्टिबाधितांना समान संधी द्या!

जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त NAB सिंधुदुर्गतर्फे मार्गदर्शन; फर्निचर व संगणक देण्याची घोषणा, दृष्टिबाधितांना पांढऱ्या काठ्यांचे वाटप

सावंतवाडी :

“पांढरी काठी ही केवळ आधार देणारी वस्तू नसून दिशा दर्शविणारी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वास देणारी महत्त्वपूर्ण साधन आहे. दृष्टिबाधित व्यक्तींना दयेची नव्हे, तर समान संधी, स्वावलंबन आणि सन्मानाची गरज आहे,” असा संदेश जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सुनील राऊळ यांनी दिला.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB), सिंधुदुर्ग यांच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी NAB सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगावकर होते. यावेळी संस्थेचे सचिव सोमनाथ जिंजी, श्रीमती विनया बाड, रोटरीचे श्री. प्रणय तेली, दृष्टिबाधित लाभार्थी, संस्थेचे पदाधिकारी आणि सेवाभावी कार्यकर्ते उपस्थित होते.
अनंत उचगावकर यांच्या सेवाकार्याचे कौतुक
“स्वतःसाठी जगणारे या जगात हजारो असतात; पण दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी जगणारे विरळेच भेटतात,” या शब्दांत अध्यक्षीय भाषणातून अनंत उचगावकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. दृष्टिबाधित बांधवांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणे, संस्था उभारणे, नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आणि अनेक कुटुंबांच्या जीवनात आशा निर्माण करणे, हे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करण्यात आले.
दृष्टिबाधित व्यक्तींना मदत करताना त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि निर्णयक्षमतेचा आदर करणे आवश्यक आहे. त्यांना कायम दुसऱ्यांच्या आधारावर ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणे, हीच खरी माणुसकी असल्याचा संदेशही देण्यात आला.
सुनील राऊळ यांच्याकडून लाभार्थ्यांना मार्गदर्शन
प्रमुख पाहुणे सुनील राऊळ यांनी दृष्टिबाधित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना पांढऱ्या काठीचे महत्त्व विशद केले. पांढरी काठी ही सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यासाठी, अडथळे ओळखण्यासाठी आणि स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाची आहे. तिच्या योग्य वापरातून आत्मविश्वास वाढतो आणि स्वावलंबनाचा मार्ग अधिक सुकर होतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नव्या संस्थेसाठी आवश्यक फर्निचर देण्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले रोटरीचे श्री. प्रणय तेली यांनी संगणक देण्याची घोषणा केली. या मदतीमुळे संस्थेच्या कामकाजाला तसेच दृष्टिबाधित लाभार्थ्यांच्या प्रशिक्षणाला हातभार लागणार आहे.
NAB नेत्र रुग्णालयाच्या आधुनिक सुविधांची माहिती
कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगावकर यांनी NAB संस्थेच्या सामाजिक कार्याची तसेच NAB नेत्र रुग्णालयाच्या सेवांची आणि उपलब्ध सुविधांची माहिती दिली. रुग्णालयात असलेले मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, विविध प्रकारच्या नेत्रतपासणीसाठी स्वतंत्र विभाग, अद्ययावत आधुनिक यंत्रसामग्री, कुशल डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी यांच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार नेत्रसेवा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या कार्याची माहिती देतानाच दृष्टिबाधित व्यक्तींना स्वावलंबी बनविणे, त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करणे, हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाबुराव गावडे यांनी काव्यातून पटवून दिले पांढऱ्या काठीचे महत्त्व
दृष्टिबाधित बाबुराव गावडे यांनी आपल्या काव्यातून पांढऱ्या काठीचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. पांढरी काठी ही दृष्टिबाधित व्यक्तीच्या जीवनातील स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचा संदेश त्यांच्या काव्यातून देण्यात आला.
कार्यक्रमासाठी पांढऱ्या काठ्यांचे वाटप आणि भोजनव्यवस्थेसाठी मुंबईतील श्री. निरंजन दीक्षित यांनी ११ हजार रुपयांची मदत पाठवली. त्यांच्या या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे सचिव श्री. सोमनाथ जिंजी यांनी केली, तर प्रमुख पाहुण्यांची ओळख श्रीमती विनया बाड यांनी करून दिली. श्री. शिवकुमार अनंत उचगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आणि दृष्टिबाधित लाभार्थ्यांना पांढऱ्या काठ्यांचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमातून दृष्टिबाधित व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची, त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्याची आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची गरज अधोरेखित झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा