दशावतार कलेची धुरा पुन्हा सुभाष लोंढेंच्या खांद्यावर!
दोडामार्ग दशावतार कलाकार समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड; विलास गवस उपाध्यक्ष, शंकर जाधव सचिव
*साटेली भेडशी / प्रतिनिधी :
कोकणच्या मातीत रुजलेली, पिढ्यान्पिढ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी आणि गावागावच्या जागरांतून आजही आपली सांस्कृतिक ओळख जपणारी दशावताराची लोककला अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची जबाबदारी पुन्हा एकदा सुभाष नारायण लोंढे यांच्या खांद्यावर आली आहे.दशावतार कलाकार समिती, दोडामार्गच्या अध्यक्षपदी सुभाष नारायण लोंढे यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विलास नारायण गवस, तर सचिवपदी शंकर मधुकर जाधव यांची निवड झाली.
श्री देवी माऊली मंदिर, मोरगाव येथे रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी ज्येष्ठ दशावतारी कलाकार कृष्णा यशवंत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समितीच्या नूतन कार्यकारिणीला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. यावेळी उपस्थित कलाकारांनी एकजुटीने निर्णय घेत दशावतार कलेच्या संवर्धनासाठी समितीची वाटचाल अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
*पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; फेररचनेनंतर कार्यकारिणीला मान्यता*
दशावतार कलाकार समितीच्या कार्यकारिणीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नव्या कार्यकारिणीच्या निवडीबाबत दि. १६ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. विद्यमान कार्यकारिणी कायम ठेवावी, अशी भूमिका बहुतांश कलाकारांनी मांडली होती. त्यास उपस्थितांनी एकमताने पाठिंबा दिला.मात्र, समितीच्या बैठकींना नियमित उपस्थित न राहणाऱ्या काही सदस्यांच्या जागी सक्रिय कलाकारांना संधी देण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. त्यानुसार आवश्यक ते फेरबदल करून कार्यकारिणी निश्चित करण्यात आली होती. या कार्यकारिणीला पुढील बैठकीत अधिकृत मान्यता देण्याचे ठरले होते. त्यानुसार मोरगाव येथील बैठकीत नूतन कार्यकारिणीला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
*दशावताराचा वारसा जपण्याची जबाबदारी* दशावतार म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर कोकणच्या लोकजीवनाशी, श्रद्धेशी आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेली एक समृद्ध लोककला आहे. बदलत्या काळात या कलेसमोर अनेक आव्हाने उभी असताना कलाकारांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणे आणि नव्या पिढीपर्यंत दशावताराची परंपरा पोहोचविणे, ही समितीसमोरील मोठी जबाबदारी आहे.
सुभाष लोंढे यांच्या नेतृत्वाखाली समितीला पुन्हा एकदा संधी मिळाल्याने दशावतार कलेच्या जतन-संवर्धनासाठी आणि कलाकारांच्या हितासाठी ठोसपणे काम करण्याच्या अपेक्षा कलाकार व रसिकांकडून व्यक्त होत आहेत.
*नूतन कार्यकारिणी*
अध्यक्ष : सुभाष नारायण लोंढे, उपाध्यक्ष : विलास नारायण गवस, सचिव : शंकर मधुकर जाधव, सहसचिव : अजिंक्य शिवाजी गवस, खजिनदार : राजेंद्र सहदेव बांदेकर, सहखजिनदार : देवेंद्र विष्णू भैरवकर, सल्लागार : कृष्णा यशवंत नाईक, अंकुश विष्णू जाधव, सदस्य : अशोक गंगाराम गवस, सुधीर बाबाजी परब, अभिमन्यू सहदेव बांदेकर, कृष्णा गणू कुंभार, विठ्ठल भानुदास गावकर, नारायण मनोहर खांबेल, सूर्याजी भिकाजी गवस, भगवान वासुदेव नाईक, सुरेंद्र भालचंद्र कवठणकर, प्रकाश लक्ष्मण वर्णेकर आणि रामचंद्र बाबाजी गवस.
*कलाकारांची मोठी उपस्थिती*
बैठकीला सुभाष नारायण लोंढे, विलास नारायण गवस, शंकर मधुकर जाधव, अंकुश विष्णू जाधव, फटी रत्नु गवस, राजेंद्र सहदेव बांदेकर, कृष्णा यशवंत नाईक, गंगाराम गणपत देसाई, नारायण मनोहर खांबल, संजय बाळकृष्ण ठाकुर, भिकाजी अर्जुन गवस, सुभाष कृष्णा गवस, प्रभाकर गोपाळ गवस, संदीप धोंडू गवस, देवेंद्र विष्णू भैरवकर, सतीश लाडू गवस, नारायण महादेव गवस, सुधीर सदानंद गवस, प्रमोद काशीनाथ गवस, सुधीर बाबाजी परब, अजिंक्य शिवाजी गवस, विठ्ठल सोमनाथ म्हावळणकर, संभाजी रामचंद्र गवस, अशोक गंगाराम गवस, प्रकाश विष्णू गवस, विठ्ठल बाबाजी सावंत, विष्णू ज्ञानेश्वर गवस, आनंद बापू गवस, भगवान वासुदेव नाईक, सूर्याजी भिकाजी गवस, जयदेव गोपाळ गवस, विठ्ठल भिकाजी गवस, रत्नाकर भिवा गवस, गुरुदास लक्ष्मण गवस यांच्यासह मोठ्या संख्येने दशावतारी कलाकार उपस्थित होते.
कोकणच्या मातीतला हा पारंपरिक कलावैभव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान आता नूतन कार्यकारिणीसमोर आहे. त्यामुळे सुभाष लोंढे यांच्या नेतृत्वाखाली दशावतार कलाकार समितीची पुढील वाटचाल कशी होते, याकडे कलाकारांसह दशावतारप्रेमी रसिकांचे लक्ष लागले आहे.
