मोरगावात श्रमदानातून साकारला वनराई बंधारा!
*विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग;*
*दोडामार्ग*
जलसंधारणातून जलसमृद्धीचा संकल्प
मोरगाव : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संदेशाला कृतीची जोड देत मोरगाव येथे ग्रामपंचायत, दोन्ही शाळा आणि ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून श्रमदानाने वनराई बंधारा साकारण्यात आला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळीत वाढ करणे आणि परिसरातील जलस्रोतांचे संवर्धन करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांपासून ग्रामस्थांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदानातून जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला.
या उपक्रमाला गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस आणि गटशिक्षणाधिकारी नदाफ साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. सरपंच संतोष आईर, उपसरपंच देविदास पिरणकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिमन्यू ठाकूर आणि उपाध्यक्ष नितेश कदम यांच्या सहभागातून या उपक्रमाला प्रोत्साहन मिळाले. दोन्ही शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत बंधाऱ्याच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले.
या वनराई बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यास मदत होणार असून, परिसरातील विहिरी आणि इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमातून विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचे प्रत्यक्ष शिक्षण मिळाले. पुस्तकातील जलसंधारणाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाल्याने या उपक्रमाला शैक्षणिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
गावाच्या विकासासाठी केवळ निधीच नव्हे, तर लोकांची इच्छाशक्ती, श्रम आणि एकजूटही महत्त्वाची असते, याचा प्रत्यय मोरगावच्या या उपक्रमातून आला. आजच्या श्रमदानातून उद्याच्या जलसमृद्धीचा पाया रचणारा हा वनराई बंधारा म्हणजे केवळ पाणी अडविण्याचा प्रयत्न नसून, भावी पिढ्यांसाठी पाण्याचा ठेवा जपण्याचा सामूहिक संकल्प आहे. ‘गाव एकवटले की विकासाची वाट सुकर होते’ हा संदेश देणारा मोरगावचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.
