आरोस येथे १७ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन
आरोस, ता. सावंतवाडी
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, आरोस यांच्या वतीने आरोस येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दिनांक ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता *राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे* आयोजन करण्यात आले आहे.
कोकणातील पारंपरिक भजन कलेचे जतन व संवर्धन व्हावे, भजन परंपरेला प्रोत्साहन मिळावे, भजनप्रेमींना दर्जेदार भजनांचा आनंद घेता यावा, तसेच नवयुवकांना भजन साधनेची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील सहभागी भजन मंडळे
या स्पर्धेसाठी एकूण सात भजन मंडळांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये स्वरब्रह्म भजन मंडळ, देवगड — बुवा श्री. प्रसाद शेवडे; लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, कणकवली — बुवा श्री. योगेश मेस्त्री; महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी (कुडाळ) — बुवा श्री. प्रसाद आमडोसकर; दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्दे — बुवा श्री. नरेंद्र मेस्त्री; श्री देव समाधी पुरुष भजन मंडळ, मळगाव — बुवा श्री. गौरांग राऊळ; श्री देव इसवटी पंचदेवी प्रासादिक भजन मंडळ, न्हावेली — बुवा श्री. सूरज पार्सेकर; आणि गोठण प्रासादिक भजन मंडळ, वजराठ — बुवा श्री. सोमेश वेंगुर्लेकर यांचा समावेश आहे.
या सात भजन मंडळांच्या सादरीकरणातून रसिकांना पारंपरिक भजन कलेचा आनंद घेण्याची संधी मिळणार असून, कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
आकर्षक रोख पारितोषिके व विशेष पुरस्कार
स्पर्धेतील विजेत्या भजन मंडळांसाठी आकर्षक रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे ठेवण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक सहभागी संघाला प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. भजन सादरीकरणातील विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक व सांघिक पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रत्येक पुरस्कारासाठी रोख रक्कम व मानाचे सन्मानचिन्ह ठेवण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट जुगलबंदी या विशेष पुरस्काराचाही समावेश करण्यात आला आहे.
*प्रेक्षकांसाठी मोफत लकी ड्रॉ*
या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेला मोफत लकी ड्रॉ. या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. भजन स्पर्धेच्या शेवटी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या भजन स्पर्धेला परिसरातील भजनप्रेमी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजनांचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, आरोस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
