*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*निरोप शाळेचा*
मला आजही स्पष्ट आठवतंय. मला आजीने लवकर लवकर ऊठवलं. अंघोळ, भांग, तीट पावडर करून छान पाटावर बसवलं. समोर वाटीत शिरा होता.
आई बाबा आदल्या दिवशी सारे समजाऊन कामावर गेले. मागचे कांही दिवस मला शाळा, नविन दप्तर, खाऊचा डबा पाण्याची बाटली असं काय काय घेऊन मला सतत न रडता शाळेत जायचं मनावर ठसवत होते.
तोच दिवस आज ऊजाडला होता. आजीने औक्षण केले. अंगारा लावला व तयार होत, सारा लवाजामा घेत आम्ही गेटबाहेर पडलो. मी मात्र नको गं!…. मला नाही जायचं!.. . म्हणत रेंगाळू बघत होतो. ती मात्र मला खेचून नेत होती. रोजची मैत्रीण माझी आजी आज असं काय करतेय हे काही ऊलगडत नव्हतं.
समोर दादाची शाळा आली आणि मी भोकाड पसरले. आजी अगदी कठोर वाटत होती. गर्दीतून आत गेलो
पाच सहा बायका, पालक, भांबावलेली रडणारी बाळं, सारे बघून मी पण जोरात रडू लागलो. आजीचा पदर घट्ट धरत ओरडू लागलो.
परंतु आजी काही विरघळेना. आज रोजचे लाड, माया हरवली होती जणू.
शेवटी एका बाईंनी मला आत खेचलंच. आजीचा हात व माझा धीर एकदमच सुटला.
दारे बंद झाली… आजी दूरवर धूसर झाली.
एका अनोळखी जगात मी एकटाच ऊरलो. हूंदके देत.
दोन तासांनी शाळा सूटली. आजी परत भेटली व मी धावत मिठी मारली.
हे काही दिवस रोजचेच झाले.
हळू हळू सगळे स्थिरावले. डबे खाणे, गाणी, गोष्टी, काही. प्रयोग करत रमत गेलो
मित्र दरवर्षी छान वाढत गेलो. वाचनालय, सहली, चित्रकला, नाच गाणी असं काय काय करत शाळा आवडू लागली.
अभ्यास, स्पर्धा, खेळ, इ. नाव कमाऊ लागलो. आई बाबा आजी सारे सुखावले.
कशी मधली अकरा वर्ष गेली व आज दहावीचा निरोप समारंभ येऊन ठेपला.
सर्व मित्र मैत्रिणी नटून सजून आलो होतो पण तोंडे ऊतरली होती.
आता कोण कूठे जाईल… कसे प्रवेश होतील… परत हेच आवडते झालेले शिक्षक, शिपाई, कर्मचारी व शाळासोबती पून्हा कधी भेटतील? मनात अगदी कालवाकालव चालू होती.
शेवटी सर्वांचा निरोप समारंभ संपला. आशीर्वाद नमस्कार झाले.
खाऊ खाऊन झाला.
आणि आता आईच्याच मायेसारखी माया जिने दिली, ज्ञान भांडार दिलं, शिस्त वळण दिले एक हुषार, ऊमदा नागरिक घडवला त्या शाळेचा निरोप घ्यायचा क्षण आला.
आता माझी माझी असणारी ही शाळा… आता मी माजी विद्यार्थी होणार होतो.
आतुनच एक हुंदका फूटला. गदगदून रडायला आले आणि एकवार पायरीवर डोके टेकवले.
इथे येतानाही रडत आलो आणि आज पून्हा परत रडतच निघालोय.
निरोपाचा हळवा क्षण काळीज कापत गेला.
आजी आठवली. तिचे त्यावेळचे मला दूर करण्याचे मनोधैर्य आठवले.
आता. एका नवीन जबाबदारीची जाणिव झाली.
अनुराधा जोशी.
9820023605
