You are currently viewing चंद्र सजला अंबरी

चंद्र सजला अंबरी

*लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासिका लेखिका कवयित्री सौ.भारती भाईक लिखित अप्रतिम ललित लेख*

 

*चंद्र सजला अंबरी*

 

…तो अर्धचंद्र सजलाय कृष्णांबरी…नि तुझे विचार विहरताहेत माझ्या मनांबरी…..क्षणभरही तू मनातून दूर जात नाहीस…सतत वावर तुझा असतो आसपास…मी एकटी नसतेसच रे केव्हाच……तो अर्धचंद्र बघ……सुंदर रुप त्याचं…लावण्यमयी….इतस्ततः विखुरलेलं चांदण्यांचं लेणं…पण तरीही अबोल तो चंद्र.. मनात कित्येक भावनांना बोलतं करुनी गेलाय..चंद्राचं ते अर्ध रुप मला खूप मोहवीतं..केवळ दिसतंय म्हणून नाही.. तर त्याचं वास्तवातलं अपूर्ण असणं मज लोभवीतं…कारण त्या अपूर्णतेला केव्हातरी पूर्णत्व लाभणार आहे.. नि त्या पूर्णत्वापर्यंतचा प्रवास मला मनापासून आवडतो…क्षणक्षण जगून घ्यावा तो क्षण…

…प्रत्यक्षात आनंद मिळण्यापेक्षा तो आनंद मजजवळी येईपर्यंत चा विलक्षण प्रवास मोहमयी..! ही अपूर्णताच भावी आनंदाची पाऊलवाट ठरते..खूप खूप आस असते त्याच्या पूर्णत्वाची नि वेडी आसच जगण्यातील चैतन्य जागरुक ठेवते…..नि जे जे अपूर्ण ते ते सुंदर असं वाटून जातं..पण तिथवरच्या प्रवासास मात्र सातत्य हवं…विनासायास व्हावी ती मनोरम मार्गक्रमणा….राधाकृष्ण चं प्रेम अपूर्ण राहीलं नि अवघं जगच वेडावलं रे……किती गोड भासतं नं त्यांचं प्रेम..आजही तरुण आहे म्हटलं त्यांचं प्रेम….हो…हो…आपल्यासारखंच..…..ते राधेचं हरवलेपण मोहवीतं मज…मला मीच गवसते तिथे….तो कृष्णाचा राधेभवतालचा भ्रमरासम वावर मनी सुखावतो मज…तू भासतोस तिथे……ती त्यांची अतूट प्रीती आवडते मज….ते तिच्या मुखावरील हरवले भाव मज भान हरपायला लावतात…नि माझ्याच मनाची एकरुपता दिसायला लागते….मीही तुझ्यात असेच भान हरपते रे…क्षणोक्षणी तुझाच आठव मन भारुन टाकतो….

….मला आता त्या अर्धचंद्राकृती लावण्यास बघता बघता तो प्रसंग आठवला रे…

 

अशीच ती वेळा होती..

तू नि मी दोघेच एकांती….

हरवलेले नयन दोहोंचे

नि गुंफलेले हात हाती….

 

…तेव्हा…..त्या अंबरात होता तो अर्धचंद्र नि नभ नक्षत्रांनी होते सजले….तेच तुझ्या डोळ्यात होते उतरले….नि मी हरवले होते त्या तुझ्या नयनांतील चांदण्यात….विहरत होते हलके हलके…वा-यासंगे….. केशसंभार ही मनमुक्त सा झालेला होता….अलगद झालेला तुझा स्पर्श गालावर गुलाब फुलवीत होता…..मृदेत जणू कित्येक रेघांनी जाळं विणलं होतं मम पाऊल अंगूलीच्या खूणांनी…सलज्जित जणू जाहली होती ती आर्द्र मृदा…मजसवे…!!!

पण मनःस्पर्श तुला मला अमुल्य…त्याचं लोण दोहोंच्याही अंतरी पसरलेलं….हो ना..?म्हणूनच

 

अबोल रात्री ,विखुरले चांदणे

त्या तिथे एकांती दोघे आपण

पण उभयतांनाही होते जणू

अबोल मर्यादेचे कुंपण….!!!

 

…तू विलक्षण गीतवेडा…त्यातही जुनी गाणी तुला ह्रदयस्थ नि कंठस्थ सुध्दा….तू एकटक मजकडे बघत होतास…मीही स्वप्निल तारंगणी होते….नि अवचित गायलीस ती ओळ…”चौदवी का चाँद हो…या आफताब हो….जो भी हो खुदा की कसम लाजबाब हो…”….”इश्श”…म्हणत मी ही वळले….. पण तुझे नयन अंतर्मनात घुसखोरी करीतच होते….पकडलेला हात काही केल्या तू सोडत नव्हतास….किती जादुई होतं ते सारं….स्वप्नवत हं….सुंदर मनोहारी रे ते क्षण…

….मी जाण्याची लगबग करताच पुन्हा तू तुझ्याच लकबीत सूर छेडीलेस। ,”अभी ना जाओ छोडकर …के दिल अभी भरा नही….”….नि मी पार अवगुंठूनी गेले…तुझा लाघव काही केल्या मोडवेना….तुझा सतत मजभवतालचा गुंजारव मज तोडवेना…..क्षणागणिक मी बावरत होते, मोहरत होते….पण तरीही माघारी परतायचं भान होतंच रे….कन्या सज्ञान झाली की, कैक बंधने तीज आपोआप लागतात…तसेच मजवरही होतेच की…पण तुझा तो आर्जव…

….नि परत काही क्षणांचं देणं लाभत असलेले मी पुनःश्च थांबले होते…दोघेही आपण स्वप्नवत ,त्या अमोघ शांततेत हरवलो होतो…..तेवढ्यात तुझं लक्ष त्या अर्धचंद्राकडे गेलं…नि तू गुणगुणलास…..”आधा हैं चंद्रमा रात आधी….रह ना जाएँ तेरीमेरी बात आधी…”नि मी तुझ्या मुखावरी माझा हात ठेवला….कारण आज जरी चंद्र नि गोष्ट अपूर्ण असली तरी भविष्यात मजला ती पूर्णच करायची होती….मी ठाम होते माझ्या वचनांवर….पण तू खट्याळपणे हाताचंच चुंबन घेत सुटलास….वाईट्ट….!!!

…………केवळ नि केवळ तू नि मी जाणावी अशी आपुली प्रीतकहाणी….तो चंद्र तेवढा होता साक्षीला….तो चंद्रही मजला हाताच्या अंतरावर जाणवत होता..खूप खूप आनंदीत झाले होते मी…आपल्या असण्याची दखल घेत अस्तित्वाची , स्वत्वाची पूजा करणारा प्रीतवेडा, प्रीतसखा मजजवळी असतांना त्या शामलांबरीची सम्राज्ञी झाल्यासारखं वाटत होतं मला…तो चांदण्यांचा मुकूट माझ्या माथी नि ती चंद्रकोर माझ्या भाळी…चंदेरी झुळझुळत्या वस्त्रांत झुळझुळणा-या वा-यावर झुळझुळत होते….नक्षत्रनक्षीने सजलेली मम काया…तुझ्या शब्दात सांगायचं म्हणजे,”नक्षत्रासम लावण्यमयी माझी प्रिया…”.तू ही कित्येक ओंजळी रातराणीच्या मजवरी रित्या केलेल्या….नि वर गुणगुणलास की…..”बहारो फुल बरसाओ मेरा मेहबूब आया है….मेरा मेहबूब आया हैं…..”……शब्दफुलांच्या उधळण्याची तर गणनाच नाही रे…अपरिमित सुखाचे ते क्षण…….खूप खूप श्रीमंत झाले मी तत्क्षणी……!!! क्षणक्षण भासे तुझ्या प्रीतीची छाया….लाभली मज अनमोल प्रेममाया….या अथांग पर्वतावरी संकलीत झालेली ती वेळा…केवळ अद्भूत सखया…केवळ अद्भूत…!!!

…आणि माझ्याअस्मितेची, मनाची जपणूक करणारे…केवळ आपल्या उभयतांचे , ते अपूर्व अपूर्ण क्षण….प्रतिक्षेत आहेत पूर्णत्वाच्या….ते असीम पूर्णत्वाचे कोंदण त्या शुभघटीकेवर होणारं गोंदण…लाभण्यासाठी अमोल अवीट प्रतिक्षेत….

“….रे चंद्रा….दिसतोय का बघ रे जरा माझा सखा…सांग की त्याला…म्हणावं, तुझी सखी व्याकुळलीय….खूप खूप प्रतिक्षा करतीये ती तुजसाठी…..दे रे निरोप तयासी….तू जाणतोस ना माझी अवस्था?…सांग की मग त्याला….ही फुले उधळलीत मी तुजवरी नि ओठही गीत गाताहेत.” मीही व्याकुळ होऊन चंद्रास म्हणाले.

…..प्रतिक्षा आहे मज आता तू परतून येण्याची…नि पुनर्मिलनाचा सोहळा परत त्या प्रीतपर्वतावरी अर्धचंद्राच्या साक्षीत…नव्हे नव्हे…पूर्णचंद्राच्या साक्षीत पूर्णत्वास नेण्यासाठी…!!!

 

 

सौ. भारती भाईक

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =