You are currently viewing शिवसेनेच्या भगव्याचा रंग बदलला, पण झेंडा काही बदलला नाही….

शिवसेनेच्या भगव्याचा रंग बदलला, पण झेंडा काही बदलला नाही….

ऐतिहासिक सावंतवाडी शहराच्या गवळी तिठा (शिवाजी चौक) या मुख्य चौकाने अनेक राजकीय मिरवणुकी पाहिल्या आहेत. शिवसेनेने याच शिवाजी चौकात शिवसेनेचा भगवा झेंडा दिमाखात फडकवत ठेवलेला आहे. सावंतवाडी शहरावरची शिवसेनेची सत्ता काहीच महिन्यांपूर्वी गेली, परंतु राज्यात शिवसेनेची सत्ता आली. शिवसेनेची मान ताठ उभी ठेऊन फडकत राहणाऱ्या शिवाजी चौकातील या भगव्याकडे मात्र शिवसेनेच्या सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले. शहरातील सत्ता गेल्याने शहराच्या नेत्यांमध्ये मरगळ आली आणि तालुक्यातील नेते राज्यात आलेल्या सत्तेची फळे चाखण्यात मश्गुल आहेत. त्यामुळे शिवाजी चौकात ऊन पावसात डौलात फडकत असलेल्या भगव्याचा रंग साफ उडून जाऊन तो फिका पडला तरी त्याच्याकडे कोणीही शिवसेनेच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेले नाही.
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शिवसेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्यांचे या फिक्या पडलेल्या भगव्या झेंड्याकडे लक्ष वेधले होते, परंतु आजही हा फिका पडलेला भगवा झेंडा बदलण्याची तसदी कोणीही घेतलेली नाही त्यामुळे शिवाजी चौकात हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. शिवसेनेत संघटनेच्या शिस्तीप्रमाणे पदाधिकारी हे तीन वर्षांनी बदलतात किंवा त्यांची फेरनिवड जाहीर होते. मात्र दीपक केसरकर आमदार झाल्यापासून आजपर्यंत काही पदाधिकारी आपल्याच पदावर चिकटून आहेत. पदाधिकारी निवडीत फेरबदल न झाल्यामुळे इतर कार्यकर्त्यांमध्ये संघटनेतील उत्साह, जोश दिसून येत नाही. संघटनेत मरगळ आल्याचे प्रकर्षाने जाणवते. याचाच प्रत्यय गवळी तिठा (शिवाजी चौक) येथील भगव्याचा रंग गेला तरी भगवा बदलण्यात येत नसल्यामुळे आला आहे. मा.बाळासाहेबांच्या आजच्या स्मृतिदिनी तरी शिवसेनेच्या सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह येणार आणि हा झेंडा बदलला जाणार का?असा प्रश्न शिवप्रेमींनी पडलेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 13 =