प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठकीत महत्त्वाचे निर्णय; विविध मुद्द्यांवर नेत्यांना जबाबदारी
मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, आ. प्रवीण दरेकर यांच्यासह महिला प्रदेशाध्यक्ष व युवा नेत्यांकडे पक्षाची भूमिका मांडण्याची धुरा
मुंबई : विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या विविध राजकीय मुद्द्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी तसेच पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रमुख नेत्यांची विशेष टीम मैदानात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने विविध मुद्द्यांनुसार अनुभवी नेत्यांकडे जबाबदारी सोपविली आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष व मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार संजय कुटे हे विरोधकांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर देत पक्षाची भूमिका मांडणार आहेत.
पक्षाची भूमिका मांडण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ आणि आमदार देवयानी फरांदे यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. युवा चेहरा म्हणून आमदार विक्रम पाचपुते आणि आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन हे विविध राजकीय मुद्द्यांवर पक्षाची बाजू मांडणार आहेत.
आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांचे खंडन करणे, तसेच शासन आणि पक्षाच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा या रणनीतीचा मुख्य उद्देश आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम विविध मुद्द्यांवर सक्रियपणे पक्षाची भूमिका मांडणार आहे.
