दुष्काळाच्या सावटावर मात करण्यासाठी सावंतवाडी मतदारसंघात ५० वनराई बंधारे
विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंधारणाचा अभिनव उपक्रम; २ ऑक्टोबरला वेतोरेत शुभारंभ
सावंतवाडी
दुष्काळाच्या संभाव्य सावटावर मात करण्यासाठी आणि पाण्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ५० वनराई बंधारे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमाचा भव्य शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावातील गुरव टेंबवाडी येथे युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. जलसंधारणाच्या या उपक्रमातून पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासह भूजल पातळी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ उत्सव न करता जलसंधारणाची चळवळ उभी करण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला आहे. सावंतवाडी मतदारसंघातील विविध गावांमध्ये ५० वनराई बंधारे उभारून भविष्यातील पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी ठोस पाऊल उचलण्यात येणार आहे.
वेतोरे येथील गुरव टेंबवाडी येथे होणाऱ्या या शुभारंभ सोहळ्यास ग्रामस्थ, युवक, कार्यकर्ते आणि जलसंधारणाच्या उपक्रमाशी जोडलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संदेशासोबत सुरू होणाऱ्या या उपक्रमाकडे मतदारसंघातील जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
