You are currently viewing खासगीकरण विरोधात कणकवलीत बँक कर्मचार्‍यांची निदर्शने..

खासगीकरण विरोधात कणकवलीत बँक कर्मचार्‍यांची निदर्शने..

शेतकरी, छोटे उद्योजकांना कर्ज मिळविणे मुश्कील होणार…

कणकवली

देशभरातील सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याला विरोध करण्यासाठी आज विविध बँक संघटनांनी कणकवलीत निदर्शने केली. सर्वच सार्वजनिक बँकांचे खासगीकरण झाले तर सर्वसामान्यांसह शेतकरी, छोटे उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी यांना कर्ज मिळविणे मुश्कील होणार असल्याची भीती यावेळी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे अध्यक्ष संतोष रानडे यांनी व्यक्त केली
विविध बँक कर्मचार्‍यांच्या संघटनांनी आज येथील बँक ऑफ महाराष्ट्र कणकवली शाखा कार्यालयासमोर समोर निदर्शने केली. यात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे अध्यक्ष संतोष रानडे, उज्ज्वला धानजी, बँक ऑफ इंडियाच्या मिताली पालव, संध्या मालवणकर, निखिल साटम, गौरव अग्रवाल, प्रणाली कडुलकर, श्रीमती मनीषा, साईबाबा काणेकर, श्रीमती गवाणकर, गणेश गावकर आदींसह बँक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
बँकांच्या खासगीकरणामुळे सर्वसामान्य जनतेच्या ठेवींची मोठी जोखीम असणार आहे. याखेरीज विविध सुप्त चार्जेसची आकारणी होण्याची शक्यता आहे. मोठ्या संस्थांना अधिकाधिक कर्जे तर छोटे उद्योग, सर्वसामान्य नागरिक यांच्याकडे दुर्लक्ष असे कर्ज वितरणाबाबतचे धोरण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँक खासगीकरणाविरोधात केवळ बँक कर्मचार्‍यांनीच उतरून चालणार नाही तर सर्वसामान्य जनतेनेही या लढ्यात उतरायला हवे असे आवाहन यावेळी विविध बँक संघटनांच्या प्रतिनिधींनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा