You are currently viewing तू यावंसं… माझ्यातला ऋतू बदलून

तू यावंसं… माझ्यातला ऋतू बदलून

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तू यावंसं… माझ्यातला ऋतू बदलून*

 

तू यावंसं

माझ्यातला ऋतू बदलून

उन्हाच्या कपाळावर

पावसाची ओल ठेवून

आणि कोरड्या मनाच्या वाटेवर

हळुवार हिरवळ पेरून

 

कितीतरी दिवस झाले

मनाच्या खिडकीत संध्याकाळच थांबली आहे

चांदण्यांनीही जणू

तुझ्या आठवणींचीच शाल पांघरली आहे

शब्द ओठांवर येतात

पण तुझ्याविना मुक होतात

आणि डोळ्यांच्या काठावरचे ढग

नकळत तुझंच नाव ओथंबून वाहतात

 

तू यावंसं

एखाद्या मंद वाऱ्यासारखं

ज्याला येण्याची चाहूल नसते

पण स्पर्श होताच

साऱ्या अंगणात गंध भरतो

एखाद्या पहिल्या पावसासारखं

ज्याच्या थेंबांत आभाळ नसतं

तर मनाच्या मातीला

पुन्हा जगण्याचं कारण मिळतं

 

माझ्या आत

एक ऋतू अजूनही कोमेजलेला आहे

फुलांच्या ओठांवर

दवाचा थेंब थांबलेला आहे

तू आलास तर कदाचित

वसंताला पुन्हा पालवी फुटेल

माझ्या हरवलेल्या हास्याच्या वाटेवर

चांदण्यांची पाऊलवाट उमटेल

 

तू यावंसं

माझ्या शांततेला स्वर देऊन

माझ्या एकटेपणाला स्पर्श देऊन

मनाच्या बंद दरवाज्यांना

एखादी प्रेमाची किल्ली देऊन

तू काही बोलू नकोस

फक्त जवळ बसावंसं

कारण काही नाती

शब्दांनी नाही

तर नजरेच्या मौनातून उमलतात

 

माझ्या उदास आभाळाला

तुझ्या हसण्याचा सूर्य मिळावा

माझ्या रात्रींच्या पदराला

तुझ्या चांदण्यांचा स्पर्श व्हावा

ज्या स्वप्नांना काळाने

हळूहळू धूसर केलं आहे

त्यांच्या डोळ्यांत पुन्हा

तुझ्या येण्याचं आकाश भरावं

 

तू यावंसं

इतकंच नाही

तू आल्यानंतर

माझ्यातला ‘मी’च बदलून जावा.

जुन्या दुःखांची राख उडून जावी

नव्या आशेची पालवी फुटावी

आणि मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात

तुझ्या अस्तित्वाचा

एक मंद सुगंध राहावा

 

कारण तू म्हणजे

फक्त येणं नाहीस

तू आलास की

ऋतू बदलतात

शब्दांना अर्थ मिळतो

श्वासांना लय सापडते

आणि आयुष्याच्या कोऱ्या पानावर

प्रेमाची पहिली ओळ

पुन्हा उमलते

 

तू यावंसं…

माझ्यातला ऋतू बदलून

आणि जाताना

मला माझ्यापेक्षा

थोडं अधिक सुंदर

करून जावंसं…

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा