You are currently viewing गजाननाच्या आगमनाने

गजाननाच्या आगमनाने

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गजाननाच्या आगमनाने* 

 

वृत्त : समुदितमदना

 

मनामनाशी फुटून आले आनंदाचे झरे

गजाननाच्या आगमनाने प्रमुदित झाली घरे

 

दूर गावचे भाऊ भाऊ गोळा होती इथे

वर्षा मधले हर्ष खुशीचे पर्व चालते तिथे

सारे जमता घरास मिळते रूप मनोहर खरे

गजाननाच्या आगमनाने प्रमुदित झाली घरे

 

रोज नवनव्या पक्वान्नास्तव सदैव जळती चुली

झिम्मा फुगडी, पिंग्या सोबत गोफ गुंफती मुली

आरतीसवे साथ द्यायला घर भक्तांनी भरे

गजाननाच्या आगमनाने प्रमुदित झाली घरे

 

गंजीफाचा डाव सदोदित ओटी वरती पडे

गावामधल्या गणगोताचे तिथेच दर्शन घडे

आप्तासोबत सोनेरी ते दिन वेगाने सरे

गजाननाच्या आगमनाने प्रमुदित झाली घरे

 

श्रीनिवास गडकरी

बावधन पुणे

@सर्व हक्क सुरक्षित

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

मोबाईल 9130861304

16.09.2026

प्रतिक्रिया व्यक्त करा