You are currently viewing गणराया… तू येताना

गणराया… तू येताना

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गणराया… तू येताना*

 

गणराया,

तू येताना

तेव्हा केवळ

एक मूर्ती घरात येत नाही तर

आशेचा एक दीप

मनाच्या कोपऱ्यात उजळतो..

 

वक्रतुंडा,

तुझ्या वळणदार सोंडेपेक्षा

आमचे जीवन अधिक वाकडे झाले आहे

स्वार्थाच्या वळणांवर

माणूस माणसापासून दूर जात आहे

या वाकड्या वाटांना

सत्याची दिशा दे..

 

विघ्नहर्त्या,

आमच्या वाटेतील दगडच नाही,

तर मनातले अहंकारही दूर कर,

जात, धर्म, भाषा, संपत्तीच्या

अदृश्य भिंती पाडून

एकमेकांच्या दुःखात उभे राहण्याचे

बळ दे..

 

गजानना,

तुझ्या उत्सवात

ढोल-ताशे वाजू देत,

पण त्याहून मोठा नाद

माणुसकीचा असू दे,

तुझ्या विसर्जनानंतरही

नदी स्वच्छ, आकाश निर्मळ

आणि अंतःकरण पवित्र राहू दे..

 

विनायका,

मोदकांच्या गोडीपेक्षा

आमच्या शब्दांत गोडवा येऊ दे,

आरतीच्या प्रकाशापेक्षा

कर्मांचा प्रकाश मोठा होऊ दे..

 

आणि शेवटी

तुझी मातीची मूर्ती

पाण्यात विरघळेल,

पण तुझा विचार

मनात ना विरघळू दे..

 

‘गणपती बाप्पा मोरया!’

हा जयघोष

निनादू नये फक्त मुखातून,

तो दररोज ऐकू यावा

प्रत्येक माणसाच्या कृतीतून…

 

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा