You are currently viewing जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात भाजपचे महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात भाजपचे महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात भाजपचे महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध सामाजिक उपक्रम

सिंधुदुर्गनगरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतही या अभियानांतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी भाजप सरचिटणीस महेश सारंग आणि सोशल मीडिया संयोजक राजू परब उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार आहे.

अभियानाची सुरुवात १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ या उपक्रमाने होणार आहे. तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील एका मोठ्या प्रकल्पाच्या ठिकाणी तसेच प्रत्येक घरात दीपप्रज्वलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत. या उपक्रमाची जबाबदारी संयोजिका श्वेता कोरगावकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

‘सेवा, सहभाग आणि संकल्प’ या तीन सूत्रांवर आधारित या अभियानातून नागरिकांना समाजसेवेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी विविध उपक्रमांची आखणी करून संयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चित्रकला व भाषण स्पर्धेचे नेतृत्व प्रमोद कामत करणार असून, ‘नमो सेवा गाथा’ अंतर्गत राजन गिरप यांच्या नियोजनातून पथनाट्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. अनुराधा नारकर यांच्या नेतृत्वाखाली ‘आंगण का उत्सव’मधून पोषण व आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. श्रीकृष्ण परब यांच्या माध्यमातून ‘कहानी बदलाव की’ रील स्पर्धेतून लाभार्थ्यांच्या कथा लोकांपर्यंत पोहोचविण्यात येतील.

संदीप मेत्री यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत व सेवा ज्योती यात्रा’ रॅली, तर संदीप गावडे यांच्या माध्यमातून ‘जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे. प्रितेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली ‘सेवा मेरा योगदान’ अंतर्गत २५ सेवा उपक्रम राबविण्यात येणार असून, मनीष दळवी यांच्या संयोजनाखाली ‘सेवा सेतू’च्या माध्यमातून शासकीय योजनांचे विशेष कॅम्प घेण्यात येणार आहेत.

अभियानात रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी, करिअर मार्गदर्शन, नशामुक्ती, महिला आरोग्य, सायबर सुरक्षा आणि दिव्यांग सहाय्य अशा विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पनेला बळ देणारे हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा