You are currently viewing कणकवली व्यापारी संघाची वीज कार्यालयावर धडक…

कणकवली व्यापारी संघाची वीज कार्यालयावर धडक…

जून पर्यंतचे थकीत बिल भरण्यास मुदतवाढ द्या; अधिकाऱ्यांकडे मागणी…

कणकवली

लॉकडाऊन मुळे व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली असतानाच विज बिल वसुलीचा तगादा लावला जात आहे. व्यापाऱ्यांना दिलासा देण्याऐवजी महावितरणकडून त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. असा आरोप करत कणकवली तालुका व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने वीज वितरण चे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची सोमवारी भेट घेत लक्ष वेधले.
मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला ३१ मार्चपर्यंत थकित वीज बिल वसुलीची डेडलाईन देण्यात आली आहे. तोपर्यंत वीज बिल वसुली न झाल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती श्री मोहिते यांनी दिली. तुम्ही जरी मोहीम राबवला तरी मोहीम राबवून विद्युत कनेक्शन कट करून बिल वसुली होणार का? या उलट तुम्ही व्यापाऱ्यांना सहकार्याची भूमिका घ्या व्यापारीही टप्प्याटप्प्याने बिल भरत विज वितरणला सहकार्याची भूमिका घेतील असे कणकवली तालुका व्यापारी संघाचे सेक्रेटरी विलास कोरगावकर यांनी सांगितले. ३१ मार्च पर्यंत वसुलीची डेडलाईन वाढवून देण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करावी लागणार असे श्री मोहिते यांनी सांगितले. शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेअंती अखेर व्यापाऱ्यांची वीज बिले ३१ मार्च पर्यंत टप्प्याटप्प्याने भरणा करण्यास सवलत देण्यात येईल असे श्री मोहिते यांनी स्पष्ट केले. पण आम्हाला ३१ मार्च डेडलाईन नकोच अशी भूमिका व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने घेतली. याउलट ज्या व्यापाऱ्यांची वीज बिले थकीत आहेत अशांची यादी द्या, त्यांना व्यापारी संघामार्फत आम्ही आवाहन करून ३१ मार्चपर्यंत एकूण बिलाच्या अर्धे बिल भरणा करायला आवाहन करतो असे शिष्टमंडळाला कडून सांगण्यात आले. त्यावर कार्यकारी अभियंता श्री मोहिते यांनी सकारात्मक भूमिका घेतली. ५०% वीज बिल भरणा करण्याची सवलत ही माझ्या रिस्कवर देत असल्याचे श्री मोहिते यांनी स्पष्ट केले. ३१ मार्च पर्यंत ची डेडलाईन दिलात तर विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी किंवा तगादा लावण्यासाठी पथके पाठवू नका अशी मागणी श्री कोरगावकर व श्री नार्वेकर यांनी केली. मात्र श्री मोहिते यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे कारण सांगत यावर अधिक बोलण्यास नकार दिला. त्यावेळी तुमची तशीच भूमिका असेल तर कणकवली पूर्ण कनेक्शन बंद करा बाजारपेठ अंधारात जाऊ दे, मग पालकमंत्र्यांना भेटून आम्ही मार्ग काढू असा इशारा सुजित जाधव यांनी दिला. मात्र अशी टोकाची भूमिका घेऊया नको. यातून व्यावहारिक मार्ग काढू असे आवाहन श्री मोहिते यांनी केले. विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी रितसर नोटीस देण्याची गरज होती. मात्र वीज वितरण कडून तशा नोटिसा दिल्या जात नसल्याचा मुद्दा व्यापारी शिष्टमंडळाने मांडला. त्यावर सहाय्यक अभियंता श्री नलावडे यांनी एम ए आर सी च्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकाला थकबाकी भरणा करण्याबाबत मोबाईल ला मेसेज पाठवले जात असल्याचे सांगितले. मात्र ज्यांना मेसेज वाचता येत नाहीत, ज्यांच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही अशांनी काय करायचे असा सवाल राजेश राज्याध्यक्ष यांनी केला. सर्वच व्यापारी एक रकमी बिले भरू शकत नाहीत. लॉकडाउनच्या काळात व्यापार-उदीम बंद झालेला असताना वीज बिले भरायची कशी असा सवाल महेश नार्वेकर यांनी केला. १० ते १५ हजार महिन्याला कमावणाऱ्या सर्वसामान्य व्यापाऱ्यांना एक रकमी वीज बिल भरणे शक्य कसे होणार? असा सवाल विलास कोरगावकर यांनी केला. लॉकडाऊन नंतर बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असून ग्राहक नसल्यामुळे व्यापारही मंदावला आहे . अशा स्थितीत वीज बिल कसे भरायचे असा सवाल सुजित जाधव यांनी केला. मात्र किती झाले तरी ३१ मार्च ची डेडलाईन वाढवून देता येणार नाही असे मोहिते यांनी स्पष्ट केले. मात्र कणकवलीतील व्यापाऱ्यांना दिलासा म्हणून एकूण थकबाकी रकमेत हप्त्याने वीजबिल भरणा करून पन्नास टक्के वीज बिल एका वेळी भरणा करा ३१ मार्च पर्यंत ही रक्कम पूर्ण करा असे आवाहन श्री मोहिते यांनी केले. मात्र तुम्ही असे सांगत असताना उद्या शहर अभियंता किंवा वीज वितरण चे पथक जर वसुलीला किंवा विद्युत पुरवठा खंडित करायला येता नये. तशा त्यांना सूचना द्या अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर संबंधितांना सूचना देतो असे श्री मोहिते यांनी सांगितले. आतापर्यंत व्यापार्‍यांची वीज बिले केव्हा थकीत राहिली नाहीत. मात्र कोरोनामुळे ही परिस्थिती उद्भवली. तुम्हीही सहकार्याची भूमिका घ्या, व्यापारी तुम्हाला सहकार्य करतील असे आवाहन व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने केले. चर्चेअंती 31 मार्च पर्यंत टप्प्याटप्याने विज बिल भरणा करा असे आवाहन श्री मोहिते यांनी केले. याप्रसंगी व्यापारी संघाचे सेक्रेटरी विलास कोरगावकर, जिल्हा व्यापारी संघाचे माजी कार्यवाह महेश नार्वेकर, राजेश राजाध्यक्ष, सुजित जाधव, बंडू खोत, शेखर गणपत्ये, संतोष काकडे, सुरभा गावकर, सहाय्यक अभियंता संतोष नलावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =