You are currently viewing गणपतीची आरती

गणपतीची आरती

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*गणपतीची आरती*

(अर्थ आणि महत्व)

~~~~~~~~~~~~~~~

आरती म्हणजे ईश्वराचे गुणगान,त्याचा जयजयकार,उदो उदो!

आपण सर्वजण जाणतो की देव भावाचा भुकेला आहे. त्याच्याकडे गरीब~श्रीमंत,उच्च~नीच,श्रेष्ठ~कनिष्ठ असा कोणताच भेदभाव नाही. जो त्याची मनोभावे पूजा करतो,त्याचेच नाव सदैव ज्या भक्ताच्या ओठावर असते त्याच्या पाठीशी परमेश्वर कायम उभा असतो. देवतांची, आपल्या लाडक्या दैवताची जेव्हा आरती गायली जाते त्यावेळी भक्त आणि त्याचे दैवत हे एकरूप झालेले असतात. भक्ताला एका ईश्वराच्या रूपाखेरीज दुसरे काहीच दिसत नाही.मनाची ही अवस्था म्हणजेच आरती.

गणपती, विद्येचे दैवत,संकट मोचक म्हणून कोणत्याही कार्यारंभी श्रीगणेशाचे पूजन केले जाते. हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवांचे वर्णन जरी असले तरी कोणत्याही पूजेच्या वेळी समर्थ रामदास यांनी लिहिलेल्या गणपतीच्या आरतीनेच सुरवात होते.

अतिशय सुलभ आणि सोप्या शब्दात ही आरती लिहिली आहे.ते म्हणतात,

*सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची*

*नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची*

अर्थात~तू सुखकारक आहेस,तू सर्व दुःखांचे हरण करतोस,कोणत्याही कार्यात विघ्न येणार नाही याची खबरदारी घेतोस,तुझ्या भक्तांवर तुझे प्रेम आणि कृपा आहे.

*सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची*

*कंठी झळके माळ मुक्ताफळांची*

तुझ्या सर्वांगाला तू शेंदूराची उटी(आजच्या भाषेतpack) लावली आहेस आणि तुझ्या गळ्यात मोत्यांची माला शोभत आहे,झळकत आहे.

*जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती*

*दर्शनमात्रेमन कामनापूर्ती*

तू मांगल्याची,पावित्र्याची मूर्ती आहेस,हे देवा तुझा जयजयकार असो.तुझ्या ह्या मंगल दर्शनाने सर्व मनोकामना,इच्छा पूर्ण होतात.

*रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा*

*चंदनाची उटी कुंकुमकेशरा*

*हिरेजडित मुकुट शोभतो बरा*

*रुणुझुणुती नूपूरे चरणी घागरिया*

हे पार्वतीच्या नंदना तू ल्यायिलेली रत्नजडित आभूषणे,कपाळावरील कुंकुमतिलक,सर्वांगास लावलेली सुगंधी केशर चंदनाची उटी आणि तुझ्या शिरावरील हिर्‍यांनी जडविलेला मुकूट अतिशय शोभून दिसतो.तुझ्या पायात घातलेले घुंगूर रुणझुण रुणझुण निनादत आहेत.

*लंबोदर पीतांबर फणिवर बंधना*

*सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना*

*दास रामाचा वाट पाहे सदना*

*संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना*

तुझे पोट मोठे आहे आणि कमरेला नागाचे मुख असलेला करगोटा तू बांधलेला आहेस.तू पीत वस्र परिधान केले आहेस.हत्तीच्या सोंडेमुळे तुझे मुख वाकडे दिसत असून तुला तीन नेत्र आहेत.

अशा तुला हे गजानना हा रामदास तुझी त्याच्या घरी आतूरतेने वाट पहात आहे. हे वंदनीय, सकल देवांच्या श्रेष्ठ देवा तू मला पाव आणि सर्व संकटांपासून माझे रक्षण कर.

मी तुझा जयजयकार करत आहे.

 

*अरूणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

प्रतिक्रिया व्यक्त करा