‘Indian Co-operative Excellence Awards – 2026’ पुरस्काराने सन्मानित!
विटा / प्रदीप जोशी :
सहकार क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर प्रगतीची वाटचाल करणाऱ्या शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., विटा या संस्थेला देशपातळीवरील प्रतिष्ठेचा ‘Indian Co-operative Excellence Awards – 2026’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्थेचे व्हा. चेअरमन मा. हणमंतराव सपकाळ, कार्यकारी संचालक मा. विठ्ठलराव साळुंखे आणि कर्ज विभाग अधिकारी विशाल चव्हाण यांनी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. या राष्ट्रीय सन्मानामुळे शिवप्रताप मल्टीस्टेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, संस्थेच्या आजवरच्या वाटचालीतील हा एक अभिमानास्पद क्षण ठरला आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजा ओळखून त्यांना विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थापक स्व. प्रतापशेठ (दादा) साळुंखे यांनी शिवप्रताप मल्टीस्टेटची मुहूर्तमेढ रोवली. सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावण्याचे त्यांनी पाहिलेले स्वप्न आज व्यापक स्वरूप धारण करत आहे. दादांनी रुजविलेली विश्वासाची आणि सेवाभावाची परंपरा पुढे नेत संस्थेचे चेअरमन मा. शेखर (भाऊ) साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली संस्था सातत्याने प्रगती करत आहे. सभासदांचे हित, ग्राहकांचा विश्वास आणि बदलत्या काळानुसार आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यावर संस्थेने विशेष भर दिला आहे.
शिवप्रताप मल्टीस्टेटने पारंपरिक सहकारी पतसंस्थेच्या कार्यपद्धतीबरोबरच आधुनिक डिजिटल सुविधांची जोड देत ग्राहकसेवेचा विस्तार केला आहे. संस्थेमार्फत मोबाईल बँकिंग, NEFT, RTGS, IMPS, UPI QR सुविधा, बचत व मुदत ठेव योजना, सोनेतारण कर्ज, विविध कर्ज योजना यांसारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच ग्राहक सेवा केंद्रांच्या माध्यमातून दैनंदिन आर्थिक व्यवहार अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नियमित वेळेपलीकडे ग्राहकांना सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ‘शिवप्रताप मल्टीस्टेट PLUS’ ही विस्तारित वेळेतील बँकिंग सेवा ग्राहकांच्या सोयीसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतानाच ग्राहकांशी असलेले आपुलकीचे नाते जपण्यावर संस्थेचा भर राहिला आहे.
