You are currently viewing शांतता क्षेत्राची शांतता जपा; ध्वनीप्रदूषण टाळा! महानगरपालिकेचे आवाहन

शांतता क्षेत्राची शांतता जपा; ध्वनीप्रदूषण टाळा! महानगरपालिकेचे आवाहन

सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगर पालिका कार्यक्षेत्रातील शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि न्यायालयांच्या परिसरात शांतता व ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरण राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत सांगलीचे पोलीस अधीक्षक कार्यालय, सुरक्षा शाखेकडून महानगरपालिकेला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २०००, तसेच महाराष्ट्र शासनाच्या संबंधित शासन निर्णय व अधिसूचनेनुसार शैक्षणिक संस्था, रुग्णालये व न्यायालयांच्या सभोवतालचा किमान १०० मीटर परिसर शांतता क्षेत्र म्हणून विचारात घेण्यात येतो. या परिसरात शांतता राखणे आणि ध्वनीप्रदूषण टाळणे आवश्यक आहे.

२५ ठिकाणांचा शांतता क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दि. ३० जून २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील एकूण २५ शैक्षणिक संस्था, रुग्णालये व न्यायालये शांतता क्षेत्र म्हणून वर्गीकृत करण्यात आलेली आहेत.

सांगली परिसरातील भारती विद्यापीठ, सिटी हायस्कूल, बापट बाल शिक्षण मंदिर, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, म. के. आठवले विनय मंदिर, हि. हा. रा. चिं. पटवर्धन हायस्कूल, कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला, श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, विलिंग्डन महाविद्यालय, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, भारती हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय या भागाचा समावेश आहे.

मिरज परिसरातील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, ज्युबिली कन्या प्रशाला, मिरज हायस्कूल, विद्यामंदिर प्रशाला, भारत भूषण हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, दिवाणी न्यायालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वानलेस हॉस्पिटल, कृपामयी मानसोपचार रुग्णालय आणि रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल या भागाचा समावेश आहे.

 

१०० मीटर परिसरात शांतता राखणे आवश्यक आहे. शांतता क्षेत्रामध्ये संबंधित शैक्षणिक संस्था, रुग्णालय किंवा न्यायालयाच्या सभोवतालचा १०० मीटर परिसर विचारात घेतला जातो. ध्वनीप्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांचा विचार करून या परिसरात अनावश्यक ध्वनी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे नागरिकांनी शांतता क्षेत्राच्या हद्दीत अनावश्यक हॉर्न, मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक, लाऊडस्पीकर, मोठ्या आवाजातील संगीत किंवा अन्य ध्वनी निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर टाळावा.

दिवस व रात्रीची वेळ शासनाच्या परिशिष्टानुसार— दिवसाची वेळ : सकाळी ६.०० ते रात्री १०.०० रात्रीची वेळ : रात्री १०.०० ते सकाळी ६.००

शांतता क्षेत्रासाठी ध्वनीची निर्धारित मर्यादा दिवसा ५० dB(A) Leq आणि रात्री ४० dB(A) Leq अशी नमूद करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. उत्सव साजरा करताना रुग्णालयातील रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच न्यायालयीन कामकाजासाठी येणारे नागरिक यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

गणेशोत्सव मंडळे, सार्वजनिक उत्सव आयोजक, नागरिक आणि ध्वनिक्षेपकांचा वापर करणाऱ्या सर्वांनी शांतता क्षेत्राची हद्द लक्षात घेऊन ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करावे आणि पर्यावरणपूरक व संवेदनशील पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

“उत्सवाचा आनंद घ्या… शांतता क्षेत्राची शांतता जपा!” असे पत्रकात म्हटले आहे.

ध्वनीप्रदूषणमुक्त, निरोगी आणि संवेदनशील शहरासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. शांतता क्षेत्रातील नियमांचे पालन करून रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना शांत व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा