You are currently viewing तरंग काव्यसंग्रहाचे प्रकाशन 

तरंग काव्यसंग्रहाचे प्रकाशन 

सांगली, ( प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार )

माझ्यावर जीव जडव असं नाही सांगणं

हृदयात थोडी जागा ठेव इतकंच माझं मागणं…!

अशा शब्दात व्यक्त होणाऱ्या कवयित्री सुरेखा पाटील यांच्या तरंग काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र भुजबळ, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रतिभा सराफ आणि ज्येष्ठ पत्रकार मंगेश विश्वासराव यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी शारदा प्रकाशनाचे प्रकाशक प्रा. डाॅ. संतोष राणे उपस्थित होते.

 

कवयित्री सुरेखा पाटील यांच्या बहिणीने म्हणजेच उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि कवीमनाच्या प्रतिभा बिर्जे यांच्या ‘तरंग’ मधील काही कवितांचा हिंदीत अनुवाद केलेला आहे, जो मराठी कवितेइतकाच सशक्त झालेला आहे. काव्यसंग्रहाच्या अनुवादाबद्दल भुजबळ यांनी मत मांडले की या अनुवादित कविता स्वतंत्रपणे साकारलेल्यासारख्या वाटतात.

प्रतिभा बिर्जे या मुंबई आकाशवाणीच्या हिंदी निवेदिका तर ऑल इंडिया रेडिओच्या ज्येष्ठ निवेदिका होत्या म्हणून निवेदिका कीर्ती पाटसकर यांना कवयित्री प्रतिभा बिर्जे यांच्या स्मरणार्थ शारदा प्रकाशनतर्फे ‘स्वरप्रतिभा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

प्रा. प्रतिभा सराफ यांनी सुरेखा पाटील यांच्या साहित्यिक मैत्रीच्या आठवणींना उजाळा देताना सुरेखाच्या सातत्यपूर्ण लेखनाचे कौतुक केले. सुरेखा यांच्या मराठीतील शब्दांना हिंदीत ऐकण्याचा अनुभव वेगळाच आनंद देणारा असून त्यांच्या प्रत्येक कवितेत वेगळेपणाने लिहिलेले काहीतरी नवे सापडते, असे प्रतिपादन करत त्यांनी वापरलेल्या अलंकाराचे सौंदर्य उलगडून दाखवले.

या काव्यसंग्रहाच्या निर्मितीसाठी तब्बल सात ते आठ वर्षांचा कालावधी लागला. ‘तरंग’मधून आयुष्याचे नवे तरंग अनुभवायला आणि शिकायला मिळतील, अशा शुभेच्छा प्रकाशक प्रा. डॉ. संतोष राणे यांनी व्यक्त केल्या.

या संग्रहाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना देणारे मंगेश विश्वासराव यांनी कविता माणूस जोडण्याचे काम करते, असे मत व्यक्त करत ‘नेमक्या आशयाला भिडणारी कविता’ अशा शब्दात कौतुक करत कवितासंग्रहाला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सुप्रसिद्ध निवेदक दिनेश अडावदकर आणि सुरेखा पाटील यांच्या कन्या ऋचा पाटील- रायकर यांनी मराठी आणि हिंदी कवितांचे खुमासदार सादरीकरण केले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांच्या काव्यवाचनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार दत्ताराम धुगे, शुभांगी प्रधान, अंकुर रायकर तसेच पाटील कुटुंबीयाचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार उपस्थित होता. कवयित्री सुरेखा पाटील यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा