विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2027’चा शुभारंभ
युवकांनी ‘विकसित भारत क्विझ’मध्ये सहभागी व्हावे
सिंधुदुर्ग
राष्ट्रनिर्माण प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आणि मेरा युवा भारत (MY Bharat)च्या माध्यमातून ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD) 2027’ या देशव्यापी युवा सहभाग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. देशाच्या विकासासाठी युवकांच्या कल्पना, विचार, दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
VBYLD 2027 ची सुरुवात 17 ऑगस्ट 2026 रोजी ‘विकसित भारत क्विझ’ या पहिल्या टप्प्यापासून झाली आहे. देशभरातील जास्तीत जास्त युवकांचा सहभाग सुनिश्चित करण्यावर या टप्प्यात विशेष भर देण्यात आला आहे. MY Bharat पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात ही क्विझ आयोजित करण्यात येत असून, 17 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत युवकांना सहभागी होता येणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना केवळ विकासाचे लाभार्थी न राहता ‘विकसित भारत’च्या वाटचालीतील सक्रिय योगदानकर्ते आणि भागीदार म्हणून सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
VBYLD 2027 चे विविध टप्पे
टप्पा 1 – विकसित भारत क्विझ :
MY Bharat पोर्टलवर डिजिटल/ऑनलाईन क्विझ.
कालावधी : 17 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026
टप्पा 2 – विकसित भारत निबंध स्पर्धा :
क्विझमधून निवड झालेल्या सहभागी युवकांनी निश्चित केलेल्या ‘विकसित भारत’ विषयावर 500 शब्दांचा निबंध सादर करावयाचा आहे.
कालावधी : 5 ते 19 ऑक्टोबर 2026
टप्पा 3 – जिल्हास्तरीय स्पर्धा :
प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोत्तम 50 निबंधांची निवड करून सहभागी युवकांची प्रत्यक्ष सादरीकरणासाठी निवड केली जाईल.
कालावधी : 10 ते 16 नोव्हेंबर 2026
टप्पा 4 – राज्य/केंद्रशासित प्रदेश VBYLD :
जिल्हास्तरावर निवड झालेले युवक परीक्षकांसमोर आपल्या कल्पना व विचार मांडतील. त्यांच्या कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय फेरीसाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशातील संघांची निवड केली जाईल.
कालावधी : 17 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2026
टप्पा 5 – राष्ट्रीय VBYLD :
अंतिम राष्ट्रीय कार्यक्रम 10 ते 12 जानेवारी 2027 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. निवड झालेल्या युवकांना आपल्या कल्पना व दृष्टिकोन मांडण्याची संधी मिळणार असून, प्रादेशिक स्तरावरील अंतिम फेरीतील सहभागी युवकांना पंतप्रधानांसमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे.
मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्ह्यातील युवकांना ‘विकसित भारत क्विझ’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. युवकांनी या राष्ट्रीय युवा सहभाग उपक्रमात सहभागी होऊन आपले ज्ञान, कल्पकता, नेतृत्वक्षमता आणि नाविन्यपूर्ण विचार देशाच्या विकासासाठी उपयोगात आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी युवकांनी VBYLD 2027 – विकसित भारत क्विझ आणि विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2027 संदर्भातील अधिकृत मेरा युवा भारत (MY Bharat) माहितीचा संदर्भ घेऊन या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.
