You are currently viewing गोकुळ जपणारी जन्माष्टमी

गोकुळ जपणारी जन्माष्टमी

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक ज्येष्ठ मालवणी साहित्यिक श्री विनय सौदागर लिखित अप्रतिम लेख*

 

*गोकुळ जपणारी जन्माष्टमी* 

 

आमच्या तळ कोकणात हिंदू धर्मवासीय तीन वेळा मृत्तिकेचे पूजन करतात, ते श्रावण-भाद्रपद महिन्यात होते. पृथ्वीतत्वाची ती पूजा आहे. माणसाला पंचमहाभूतांचे आकर्षण आहे, कुतुहल आहे, त्याविषयी श्रद्धा आहे. नागपंचमी, जन्माष्टमी आणि गणेशोत्सव याद्वारे तो पृथ्वी म्हणजेच माती विषयी आपल्या भावना व्यक्त करतो.

 

कोकणात भातशेती प्रामुख्याने केली जाते किंवा जात असे. शेतीची नासधूस करणाऱ्या उंदिरापासून संरक्षण करतो, म्हणून नागपूजन उत्सव सुरू झाला असावा. हा सण तसा घरोघरी साध्या पद्धतीने साजरा केला जातो; तर गणेशोत्सव घरगुती पण धुमधडाक्यात साजरा होतो. गोपाळाष्टमी चे मात्र आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. ज्या घरी गणपती पुजतात ते नागोबा पुजतातच; पण सर्वसाधारण गणपती पूजन करणारी काही घराणीच श्रीकृष्ण पूजन करतात. बहुजन समाज तसं करत नाही. श्रीकृष्ण हा काहीच घरात, विशेष करून तो वाड्यात एका ठिकाणी असा साजरा केला जातो. तसा तो सार्वजनिक जन्मोत्सव असतो.

 

सार्वजनिक गणेशोत्सव इथे नव्हता व शहर सोडल्यास अद्यापही तो तसा रुजला नाही, पण हा श्रीकृष्ण जन्मोत्सव मात्र सार्वजनिक आहे. फक्त तो मोठ्या स्वरुपात नसून पारंपरिक पद्धतीत टिकून आहे. छोट्या छोट्या वाड्यात हा साजरा होतो. मुख्यत्वे एका संध्याकाळ पुरताच असल्याने कष्टकऱ्यांना सोयीचा असतो. काला-दहीहंडी इथे नव्हती. आता-आता ती साजरी होतेय आणि श्रीकृष्ण पूजनाशी त्याचा तसा थेट संबंधही नाही, संबंध फक्त त्या दिवसाशी आहे. मुंबईशी घनिष्ठ नातं असल्याने मुंबईतल्या गोष्टी इथे येतात, इथल्या तिथे जातात तसे हे आहे.

 

श्रीकृष्ण या देवतेबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटंत आलं आहे. कारागृहात जन्मलेला, मध्यरात्री जन्मलेला, देवकीच्या पोटी जन्मून यशोदेच्या घरी वाढलेला, गुराख्यांबरोबर वावरणारा, गवळणींची छेड काढणारा आणि युद्धावर पराक्रम गाजवणारा कृष्ण हा परिपूर्ण पुरुष म्हणून सगळ्यांनाच आवडतो. विशेष म्हणजे त्याने सांगितलेली भगवद्गीता ही अनेक लोकांचा पथदीप आहे. त्यामुळेच त्याचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जात असावा. दहीहंडीपेक्षा गीतेला महत्त्व हवे होते, पण तसे ते दिसत नाही.

 

त्याला तुळशी वाहिल्या जातात, ते विठ्ठल स्वरूपाचे स्मरण असावे. नैवेद्यात पोहे, दहीभात असे असते. श्रीकृष्णाला दहिभात आवडतो हे तसं समजू शकतो कारण तो गोकुळात वाढला; पण त्याला पोहे का आवडतात, हे मला समजत नाही. असो, इथल्या कृषि उत्पन्नानुसार पोहे पण ठीक, पण या दिवसाच्या जेवणातील पानात मुगाचे कढण, काळ्या वाटाण्याची उसळ यांचा कार्यकारणभाव काय असावा बरे.

 

तरीही मला वाटतं की, श्रीकृष्ण जन्मोत्सवाला अधिक महत्त्व यावं; कारण त्याने आपली संस्कृती जपलीय. अद्याप त्यात बटबटीतपणा शिरला नाही. घराण्यातील एका गणपतीचे चार-चार, पाच-पाच गणपती झालेत, पण श्रीकृष्ण मात्र एकच तसाच राहिलाय. जन्माष्टमी हा कौटुंबिक एकत्रीकरणाचा सण आहे. फार आरास केली जात नाही, नैवेद्याचे अवडंबर नाही, स्पीकर-लायटींग नाही. साध्या स्वरुपातला संस्कृती जपणारा हा सण आहे. गोकुळात तो नांदला होता, कौटुंबिक गोकुळ तो आजही अबाधित ठेवतोय आणि जपतोही.

 

*विनय वामन सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा