You are currently viewing महेश सारंग यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न

महेश सारंग यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न

सावंतवाडी :

 

भाजप युवा नेते जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांचा वाढदिवस सोमवारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांनी “माझ्या कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील माझा झालेला निसटता पराभव, हा माझ्या जीवाला लागला आहे. या मतदारसंघात कोणीही उमेदवार असला तरी भाजपचे कमळ फुलले पाहिजे. त्या दृष्टीने माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व माझ्या पुढच्या वाढदिवसाला हा मतदारसंघ भाजपचे कमळ फुलवून भेट द्यावी,” असे भावनिक आवाहन भाजपचे जिल्हा चिटणीस व जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी आपल्या वाढदिवसाच्या प्रसंगी अभिष्टचिंतन सोहळ्यात व्यक्त केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महेश सारंग यांच्या भावी वाटचालीस देताना सारंग यांची राजकीय कारकीर्द उत्तरोत्तर बहरत जावो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे आपण आजतागायत राजकारणात टिकून आहोत, असेच प्रेम आपण कायम ठेवावे, मात्र मी ज्या मतदार संघाचे नेतृत्व करतो, त्या मतदारसंघात यश खेचून आणतो. असे असताना माझ्याच मतदारसंघात माझाच अगदी थोडक्या मतांनी झालेला पराभव हा माझ्या जिव्हारी लागला आहे. येत्या काही महिन्यातच जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. या ठिकाणी आरक्षण काही पडो, मात्र भाजपचेच कमळ या मतदारसंघात फुलले पाहिजे, त्या दृष्टीने आतापासूनच कामाला लागा व या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आणून मला वाढदिवसाची भेट द्या!, असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना सारंग यांनी केले.

कोलगावचे सरपंच संतोष राऊळ यांनी यावेळी महेश सारंग यांचे मार्गदर्शन हे आमच्यासाठी लाख मोलाचे आहे. कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र झटणारा व मेहनत करणारा सच्चा कार्यकर्ता महेश सारंग आहेत. म्हणूनच त्यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. कोलगाव ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांना दीर्घायुष्य चिंतून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच नगरसेवक ॲड. परिमल नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी पाणी पुरवठा सभापती उदय नाईक, यांनी महेश सारंग यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. सरपंच दिनेश सारंग, संदीप हळदणकर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा