नवीन जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येणार : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
शासन शुद्धीपत्रकातील तरतुदी व प्राप्त शासन निर्देशांनुसार, सांगली जिल्ह्यात सद्यःस्थितीत नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापनेची सुरू असलेली वाटप प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर रद्द करण्यात आली आहे. शासन शुद्धीपत्रक दि. 9 जुलै 2026 मधील सुधारित अटी, शर्ती व गुणांकन निकषांनुसार लवकरच नव्याने नवीन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल आणि सर्व पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज करता येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 805 नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली कडून दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी अटी व शर्तीसह जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याअनुषंगाने विहित मुदतीत एकूण 2249 अर्ज प्राप्त झाले असून, सदर अर्जाची छाननी अंतिम टप्प्यात सुरू होती. तथापि महाराष्ट्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागामार्फत दि. 9 जुलै 2026 रोजी शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले असून, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीचे निकष, पायाभूत सुविधा, छाननी समितीची रचना आणि गुणांकन पद्धतीमध्ये व्यापक सुधारणा (बदल) करण्यात आली आहे.
शासनाने दिनांक 25 ऑगस्ट 2026 च्या पत्रान्वये (जिल्हाधिकारी, अकोला यांना दिलेल्या मार्गदर्शनानुसार) स्पष्ट केले आहे की, दिनांक 9 जुलै 2026 पूर्वी सुरू झालेली परंतु अंतिम टप्प्यापर्यंत पूर्ण न झालेली निवड प्रक्रिया जुन्या निकषांनुसार पुढे चालू ठेवणे हे सुधारित शासन तरतुदींशी सुसंगत ठरणार नाही. त्यामुळे अशी अपूर्ण/प्रलंबित निवड प्रक्रिया रद्द करून दिनांक 9 जुलै 2026 च्या शासन शुद्धीपत्रकातील सुधारित निकष व कार्यपद्धतीनुसार संपूर्ण निवड प्रक्रिया नव्याने राबविणे उचित राहील, असे निर्देश दिले असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
